परंतु धोनीचा हा भारताकडून ३००वा वनडे सामना नाही !

आज सर्वजण भारताचा महान माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीच्या ३०० व्या वनडेची चर्चा करत आहे पण जर आपणास असे सांगितले की धोनीचा हा भारताकडून ३००वा वनडे सामना नसून २९७ वा आहे तर ? आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. परंतु हे खरे आहे.

चितगावला २३ डिसेंबर २००४ साली बांगलादेश संघाविरुद्ध वनडे पदार्पण केलेल्या धोनीने आजपर्यँत भारताकडून २९६ वनडे सामने खेळले असून त्यात त्याने ९४३४ धावा केल्या आहेत. तर ३ सामने हा खेळाडू आशिया ११ या संघासाठी २००७ साली खेळला आहे. त्यात त्याने ८७च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या सामन्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची मान्यता होती.

भारतासाठी २९६ तर आशिया ११ साठी ३ असे मिळून धोनी एकूण २९९ वनडे खेळला आहे. त्यात त्याने एकूण ९६०८ धावा केल्या आहेत.

भारतासाठी ज्यांनी ३००पेक्षा जास्त सामने खेळले आहेत त्यातील केवळ सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय वनडे संघाकडूनच आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत तर राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांनी आयसीसी ११ किंवा आशिया ११ याकडून एकतरी सामना खेळला आहे.