कोहली सेनेने दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला

केपटाऊन। भारताने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तिसऱ्या वनडे सामन्यात १२४ धावांनी विजय मिळवून इतिहास रचला आहे. भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत सलग तीन वनडे जिंकण्याची कामगिरी केली आहे. या विजयामुळे भारताने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. 

भारताकडून या सामन्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने मिळून ८ विकेट्स घेतल्या. तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद शतक झळकावले आहे.

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०४ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांचा अनुभवी फलंदाज हाशिम अमला डावाच्या दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर प्रभारी कर्णधार एडिन मार्करम आणि जेपी ड्युमिनेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मिळून ७८ धावांची भागीदारीही रचली. मात्र मार्करमही ३२ धावांवर बाद झाला. त्याला एमएस धोनीने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर यष्टिचित केले. यष्टिरक्षण करतानाची धोनीची ही ४०० वी विकेट ठरली.

तरीही ड्युमिनी एकाकी लढत देत होता. त्याने ५१ धावांची अर्धशतकी खेळीही केली. मात्र त्याला बाकी फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही अखेर तोही चहलच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला.

त्यानंतर मात्र बाकी फलंदाजांना काही विशेष करता आले नाही. डेव्हिड मिलर(२५), खाया झोन्डो(१७),ख्रिस मॉरिस(१४) आणि कागिसो रबाडा(१२*) यांनी काही धावा केल्या. मात्र बाकी फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करताना आली नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४० षटकात १७९ धावात संपुष्टात आला.

भारताकडून कुलदीप यादव(४/२३), युजवेंद्र चहल(४/४६) आणि जसप्रीत बुमराह(२/३२) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी भारताने ५० षटकात ६ बाद ३०३ धावा केल्या होत्या. आज भारताची देखील सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र शिखर धवन आणि कोहलीने चांगली खेळी करत भारताचा डाव सांभाळला. कोहलीने आज १५९ चेंडूत नाबाद १६० धावा केल्या. यात त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले. हे कोहलीचे वनडेतील ३४ वे शतक ठरले आहे.

त्याला सुरवातीला शिखरने भक्कम साथ दिली. शिखरनेही आज ६३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारीही रचली. पण शिखर बाद झाल्यावर नियमित अंतराने भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट गमावल्या. एकीकडे अशा विकेट्स जात असतानाही विराट खंबीरपणे खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहिला होता.

बाकी फलंदाजांमध्ये अजिंक्य रहाणे (११), हार्दिक पंड्या (१४), एमएस धोनी (१०), केदार जाधव (१) आणि भुवनेश्वर कुमार नाबाद १६ यांनी धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून रबाडा (१/५४), ख्रिस मॉरिस (१/४५), इम्रान ताहीर (१/५२), ड्युमिनी (२/६०) यांनी विकेट्स घेतल्या.