या कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश

आयसीसीने भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा यावर्षीच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. त्याच्याबरोबर यावर्षी आयसीसीने दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलेन डोनल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी दिग्गज महिला क्रिकेटपटू कॅथरिन फिट्झपॅट्रिक यांचाही ऑल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.

सचिन हा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा एकूण सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी बिशन सिंग बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या दिग्गज भारतीयांना हा सन्मान मिळाला आहे. पण अनेकांनी सचिनला कुंबळे आणि द्रविडनंतर हा सन्मान मिळाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मात्र हॉल ऑफ फेममध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यासाठी काही नियमही करण्यात आले आहेत. या नियमांच्या आधारावर दिग्गज खेळाडूंचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येतो.

हॉल ऑफ फेममध्ये समावेश होण्यासाठी फलंदाजाने वनडे किंवा कसोटी प्रकारापैकी एका प्रकारात कमीतकमी 8000 धावा आणि 20 शतके केलेली असायला हवीत किंवा त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त असायला हवी.

त्याचबरोबर गोलंदाजाचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश होण्यासाठी वनडे किंवा कसोटी प्रकारापैकी एका प्रकारात 200 पेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या असल्या पाहिजे.तसेच त्याचा स्ट्राईक रेट कसोटीत 50 आणि वनडेच 30 असायला हवा.

यष्टीरक्षकांसाठी वनडे किंवा कसोटी प्रकारांपैकी एका प्रकारात किंवा दोन्ही प्रकारात 200 पेक्षा जास्त विकेट्स घ्यायला हव्यात. तर कर्णधाराने जर 25 कसोटीत किंवा 100 वनडेत नेतृत्व करताना किमान एका प्रकारात तरी जिंकण्याची टक्केवारी 50 पेक्षा जास्त ठेवली असेल तर त्याचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जावू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे ज्या खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणार आहे, त्या खेळाडूंनी निवृत्तीनंतर पाच वर्षांत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळलेले नसावे. याच नियमामुळे सचिनचा याआधी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला नव्हता.

सचिनने 2013 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर आता त्याच्या निवृत्तीला 5 वर्षे पूर्ण झाली असल्याने त्याचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. द्रविड आणि कुंबळे यांनी सचिनच्या आधी निवृत्ती घेतली असल्याने त्यांचा सचिनच्या आधी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता.

याबरोबरच या नियमात न बसणाऱ्या विशिष्ट खेळाडूंनाही हॉल ऑफ फेममध्ये सामाविष्ट केले जाऊ शकते. पण त्यासाठी नामांकन समितीच्या सदस्यांच्या मते त्या खेळाडूने क्रिकेट इतिहासात मोठे काम केलेले असले पाहिजे.

तसेच अशा खेळाडूंचे नामांकन करण्याच्या नियमात प्रमुख पत्रकार, पंच, मॅच रेफरी किंवा प्रशासक यांनाही खेळाडूंचे नामांकन करण्याची परवानगी देता येते. 

आत्तापर्यंत हॉल ऑफ फेममध्ये एकूण 87 क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंग्लंडच्या सर्वाधिक 28 खेळाडूंचा समावेश आहे. त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या 26 खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर विंडीजचे 18 खेळाडू, भारताचे 6 खेळाडू, पाकिस्तानचे 5 खेळाडू, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 3 आणि श्रीलंकेचा एक खेळाडू आयसीसीच्या हॉल ऑफ फेमचे मानकरी ठरले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आर अश्विनने टाकलेल्या या चेंडूचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल, पहा व्हिडिओ

वाढदिवस विशेष: विचित्र शैलीचा मोहंती

एमएस धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही, त्याऐवजी करणार हे काम