महाराष्ट्रातील या ५ खेळाडूंनी गाजवले २०१७चे खेळविश्व

२०१७ वर्ष जवळ जवळ संपले आहे. हे वर्ष भारतीय खेळाडूंनी चांगलेच गाजवले. यात अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंचा मोलाचा वाटा होता. फक्त क्रिकेटचं नाही तर कुस्ती, कबड्डी अशा खेळात महाराष्ट्रातल्या खेळाडूंचे चांगलेच वर्चस्व राहिले.

२०१७ मध्ये महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंनी विविध खेळात राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्थरावर चांगली कामगिरी केली. मग यात मुंबईकर रोहित शर्मा, प्रो कबड्डी गाजवणारा रिशांक देवाडिगा, महाराष्ट्र केसरी ठरलेला अभिजित कटके यांचा समावेश आहे.

विविध खेळात महाराष्ट्रातल्या या खेळाडूंनी गाजवले २०१७ हे वर्ष

क्रिकेट: रोहित शर्मा, केदार जाधव
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली खास ओळख बनवणाऱ्या रोहित शर्माने यावर्षीही अशीच विशेष कामगिरी करत त्याने या वर्षात सर्वांना लक्षात राहील अशाच खेळी केल्या. रोहित यावर्षी केलेल्या कसोटी पुनरागमन, द्विशतक आणि आंतराष्ट्रीय टी २० मधील सर्वात जलद शतक यामुळे चांगलाच गाजला.

तो अनेक मोठ्या खेळी करताना यावर्षात सर्वाधिक धावा करणारा एकूण पाचवा तर दुसरा भारतीय फलंदाजही ठरला. त्याने यावर्षात ३२ सामन्यात खेळताना ६४.०३ च्या सरासरीने १७९३ धावा केल्या.

पुण्याच्या केदार जाधवसाठीही हे वर्ष उत्तम ठरले. त्याची या वर्षी झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठीही भारतीय संघात निवड झाली होती. तसेच त्याने अष्टपैलू कामगिरी करताना अनेकदा भारतीय संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याने या वर्षात २९ सामन्यात ३७च्या सरासरीने ५९२ धावा केल्या.

कुस्ती: अभिजित कटके
नुकतीच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या प्रतिभावान युवा मल्ल अभिजित कटकेने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डाव- प्रतिडावांची खेळी करीत प्रतिष्ठेच्या गदेवर आपले नाव कोरले. साताऱ्याच्या किरण भगतवर विजय मिळवत त्याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उचलली.
त्याच्या रूपाने महाराष्ट्र केसरीला नवीन विजेता मिळाला.

मागील वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये उपमहाराष्ट्र केसरी व यावर्षी झालेल्या स्पर्धेत उपहिंद केसरीचा किताबही अभिजित काटकेने पटकाविला आहे.

कबड्डी: रिशांक देवाडिगा
डू ऑर डाय रेड्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या रिशांक देवाडिगाला यावर्षी प्रो कबड्डीमध्ये यूपी योद्धा संघाने विकत घेतले. यूपीला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात रिशांकने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.त्याच्या या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. या स्पर्धेची सुरुवात ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथे होणार आहे.

हॉकी: आकाश चिकटे

भारतीय संघात गोलकिपर असणारा आकाश चिकटेने त्याच्या कौशल्याचे सर्वांनाच कौतुक करण्यास भाग पाडले. त्याने वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेत महत्वाचे योगदान दिले. त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे या स्पर्धेत भारताला मिळालेल्या यशात त्याचा मोलाचा वाटा होता.

टेनिस: अर्जुन कढे
२३ वर्षीय पुण्याचा युवा टेनिसपटू अर्जुन कढेचा यावर्षी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत समावेश झाल्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यावर्षी त्याने व्हिएतनाम एफ 3 फ्यूचर्स स्पर्धा देखील जिंकली आहे. याबरोबरच त्याने त्याचा खेळ सांभाळत अमेरिकेतून यावर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

फुटबॉल: अनिकेत जाधव
महाराष्ट्राचा एकमेव फुटबॉलपटू म्हणून अनिकेत जाधव यावर्षी भारतात पार पडलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकात खेळला. कोल्हापूर सारख्या शहरातून आलेल्या या खेळाडूने फुटबॉल मध्ये कारकीर्द घडवून त्याने सर्वांना चकित केले. भारतीय संघात तो स्ट्रायकर होता. भारतीय संघाला जरी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकात यश मिळालं नसलं तरी अनिकेतची कामगिरी मात्र चांगली झाली. अनिकेतने पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.