२०१७मध्ये या तीन खेळाडूंनी केले भारतीय संघाचे नेतृत्व, ३ पैकी दोन कर्णधार मराठी

भारतीय संघाने यावर्षी एकूण ५३ सामने खेळले आहेत. यापैकी ११ कसोटी, २९ वनडे आणि १३ टी २० सामने खेळले आहेत. यात या वर्षी विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

या वर्षाच्या सुरवातीलाच एम एस धोनीने सर्व प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले त्यामुळे फक्त कसोटी कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधार करण्यात आले. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने विराटच्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले आहे.

विराट कोहली: यावर्षी विराटने भारतीय संघाचे ४६ सामन्यात नेतृत्व केले आहे. यात १० कसोटी, २६ वनडे आणि १० टी २० सामन्यांचा समावेश आहे.

विराटने नेतृत्व केलेल्या १० कसोटी सामन्यांपैकी भारताने ६ सामन्यात विजय मिळवला आहे तसेच ३ सामने अनिर्णित राहिले आहे तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. विराट भारताने खेळलेल्या ११ कसोटींपैकी फक्त एका सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्याच्या जागेवर अजिंक्य रहाणेने नेतृत्व केले होते.

तसेच विराटने यावर्षी २६ वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व करताना १९ सामने जिंकले आहेत. तर ६ सामन्यात पराभव स्वीकारला आहे आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही.

१० टी २० सामन्यांचे नेतृत्व करताना विराटने ४ सामन्यात पराभव स्वीकारून ६ सामन्यात विजय मिळवला आहे. विराटने फक्त वर्षाच्या शेवटी झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे आणि टी २० मालिकेतून माघार घेतली होती. त्यामुळे या दोन्ही मालिकेत रोहित शर्माने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती.

रोहित शर्मा: यावर्षी रोहित शर्माने विराटच्या गैरहजेरीत श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या वनडे आणि टी २० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या दोन्ही मालिका प्रत्येकी ३ सामन्यांच्या झाल्या.

रोहितचा हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा पहिलाच अनुभव होता. त्याच्या नेतृत्वाच्या पहिल्याच सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. धरमशालाला झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ७ विकेट्सने पराभव स्वीकारला होता.

या सामन्यानंतर मात्र रोहितने पुढील सर्व सामने जिंकले आहेत. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या या ३ वनडे सामन्यांपैकी २ सामने आणि ३ टी २० सामन्यांपैकी सर्व तीन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

अजिंक्य रहाणे: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन,धरमशाला येथील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पार पडलेल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

या सामन्याआधी भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला खांद्याची दुखापत झाल्यामुळे संघाच्या बाहेर बसावे लागले होते. त्यामुळे कसोटीत उपकर्णधार असणाऱ्या रहाणेने संघाची धुरा सांभाळली होती. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने विजय मिळवला होता.