२०१७ मध्ये क्रिकेट वर्तुळात या ५ घटनांवर झाल्या सर्वाधिक चर्चा

भारतीय संघाचा यावर्षीचा यशस्वी मोसम संपला आहे, पण यावर्षी भारतीय क्रिकेट वर्तुळात अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या. मग यात चॅम्पिअनस ट्रॉफी असो किंवा महिला विश्वचषक. क्रिकेट रसिकांना भारतीय संघाने या वर्षी अनेक आठवणी दिल्या आहेत.

२०१७ मध्ये क्रिकेटच्या या टॉप ५ गोष्टींवर झाल्या सर्वाधिक चर्चा:

५. रोहितचे द्विशतक:

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने यावर्षी वनडे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. त्याने १३ डिसेंबरला श्रीलंका विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी केली होती.

वनडेत तिसरे द्विशतक करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्थरातून कौतुक झाले. तसेच या नंतर त्याने श्रीलंका विरुद्धच २२ डिसेंबरला दुसऱ्या टी २० सामन्यात शतक करताना आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक करण्याच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

४. धोनीने सोडले कर्णधापद:

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच ४ जानेवारीला सर्व प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. त्याचा हा निर्णय सर्वांसमोर अचानक आल्याने त्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

धोनीने तो कर्णधारपद सोडत असल्याचे बीसीसीआयला कळवले होते, त्यानंतर बीसीसीआयने ही गोष्ट सर्वांसमोर आणली. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक उलटसुलट चर्चाही झाल्या होत्या. यानंतर कसोटी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी भारताचा कर्णधार करण्यात आले.

३. चॅम्पिअन्स ट्रॉफी:

यावर्षी जून महिन्यात इंग्लंड आणि वेल्समध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफीची स्पर्धा रंगली. यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. त्यांनी साखळी फेरीत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला नमवले होते. मात्र भारतीय संघाला श्रीलंका संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर भारतीय संघाने उपांत्य सामन्यात बांग्लादेशला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु त्यांना पाकिस्तान संघाविरुद्ध अंतिम सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. कोहलीसाठी ही कर्णधार म्हणून पहिलीच मोठी स्पर्धा होती.

२. महिला विश्वचषक:

भारतीय महिला संघाने यावर्षी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठून इतिहास रचला होता. त्यांनी या विश्वचषकात केलेल्या चांगल्या कामगिरीने सर्वांनाच त्यांची दाखल घ्यायला लावली. या विश्वचषकाच्या सामन्यांचे टीव्हीवरून प्रक्षेपण झाल्याने भारतीय प्रेक्षकांना आपल्या संघाचा प्रवास अनुभवता आला.

यामुळे यावर्षी सर्वत्र भारतीय महिला संघाच्या चर्चा होत्या. यात सोशल मीडियाही मागे नव्हते. भारतीय संघाला मात्र अंतिम सामन्यात इंग्लंडकडून फक्त ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

१. विराट- अनुष्काचे लग्न:

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबरला इटलीतील मिलान शहरात लग्न केले. त्यांचा हा विवाह सोहळा कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. त्यांनी त्यांच्या लग्नबद्दल सोशल मीडियावरून बातमी दिली.

यानंतर विराट-अनुष्काने दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित केले होते. या रिसेप्शनसाठी अनेक मोठ्या राजकीय, सिनेसृष्टी, खेळ या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.