मुलाखत: ८ वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं- रिशांक देवाडिगा

हैद्राबाद । गेले ६ दिवस सुरु असलेलया कबड्डीच्या कुंभमेळ्याचा आज महाराष्ट्राच्या विजयाने समारोप झाला. तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्राला वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवता आलं. स्पर्धेत सेनादल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश किंवा राजस्थानसारखे तगडे संघ असतानाही मुंबई उपनगरच्या रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या संघाने आज स्पर्धेत विजय मिळवला.

यापूर्वी २००७मध्ये महाराष्ट्राच्या संघाला या स्पर्धत जितेश जोशी या कर्णधारच्या नेतृत्वाखाली अमरावती येथील स्पर्धेत विजय मिळवता आला होता. त्यानंतर तब्बल ११ वर्ष हे विजेतेपद महाराष्ट्राला अनेक कारणांनी हुलकावणी देत होते. परंतु या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आणि एक कर्णधार कसा असावा हे ‘lead from the front’ या उक्तीप्रमाणे सिद्ध करत रिशांकने महाराष्ट्राला एकहाती विजेतेपद जिंकून दिले.

सामन्यानंतर महा स्पोर्ट्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धा जिंकणे हे स्वप्नवत आणि महत्वाचं का आहे यावर मोकळेपणाने चर्चा केली. त्याच मुलाखतीचा हा खास भाग-

प्रश्न- रिशांक महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी या स्पर्धेचे विजेतेपदं मिळालं आहे. महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार म्हणून काय भावना आहेत?
रिशांक- खूप आनंद होतोय. विजय मिळवून २ तास झाले आहेत तरीही अजून विश्वास बसत नाही. महाराष्ट्रातील कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही कॅम्पला होतो तेव्हाच ठरवलं होत की ह्यावेळी गोल्ड मेडल घ्यायचंच आहे. गेली ८ वर्ष जे स्वप्न पाहिलं होत आज ते पूर्ण झालं आहे.

प्रश्न- प्रो कबड्डीमध्ये तू एका सामन्यात सर्वाधिक गुण घेणारा खेळाडू बनला होता तेव्हा तुझ्या नावाची खूप चर्चा झाली होती. आज तू महाराष्ट्राला हे विजेतेपद जिंकून दिलंस. आजही तुझ्या मोठी चर्चा नावाची होत आहे. काय सांगशील याबद्दल?
रिशांक- त्या गोष्टीपेक्षा आजचा दिवस आनंद देणारा आहे. महाराष्ट्रात कबड्डी खेळणारा प्रत्येक खेळाडू हे स्वप्न ठेवूनच कबड्डी खेळत असतो. त्यात मला वर्तमानात जगायला आवडते. त्यामुळे आजचा क्षण निश्चित मोठा आहे.

प्रश्न- गेल्या वर्षी चांगली कामगिरी करूनही तुझी राष्ट्रीय संघात एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी निवड झाली नाही. आजची कामगिरी हे त्याच उत्तर आहे?
रिशांक- हे तेव्हाच नाही तर खूप वेळा झालं आहे. हे का होतंय तेही मला माहित नाही. महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांचा. आपल्या हातात चांगलं काम करणं आहे. त्यामुळे आपण खरंच चांगलं काम केलं तर नक्कीच आपला विचार होईल.

प्रश्न- हे विजतेपद हे अगदी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिंकलं आहेस. तुझ्या यापुढे वर्षभर काय योजना आहेत?
रिशांक- मी वर्षभर खास करून सराव आणि फिटनेस याकडे लक्ष देणार आहे. त्यासाठी कोणतेही कष्ट घ्यायची माझी ताकद आहे. मी येत्या वर्षभरात माझ्या विभागाकडून होणाऱ्या स्पर्धा आणि राज्याकडून होणाऱ्या स्पर्धा खेळणार आहे. त्यात आपल्या संघाला विजय मिळवून देणे हाच पहिला उद्देश असेल.

प्रश्न- या स्पर्धेत कोणत्या खेळाडूची कामगिरी तुझ्यासाठी एक कर्णधार म्हणून खास राहिली?
रिशांक- नक्कीच ती नितीन मदनेची असं मी म्हणेल. तो मला संघात सिनियर खेळाडू आहे. तो सामना आणि खेळाडू यांच्यावर चांगलंच नियंत्रण ठेवतो. त्याचा मला खूप पाठिंबा मिळाला. तो एक मोठा खेळाडू आहे.

प्रश्न- संघातील तरुण खेळाडूंबद्दल काय सांगशील?
रिशांक- तरुण खेळाडूंना आम्ही स्पर्धेत खूप संधी दिली नाही परंतु ऋतुराज कोरवी आणि तुषार पाटील या खेळाडूंना जी काही संधी मिळाली त्यांनी तीच सोनं केलं. तुषारने संघ अडचणीत असताना काही गुण घेतले ते खूप महत्वाचे ठरले.

प्रश्न- एवढं मोठं विजेतेपद आहे. मग हा विजय कसा साजरा करणार आहात ?
रिशांक- आम्ही सर्व खेळाडू लवकरच मुंबई शहरात भेटू आणि हे विजेतेपद साजरं करण्यासाठी काहीतरी खास आयोजन नक्की करू.