शनिवार व रविवारी रंगणार रोमांचकारी अश्वशर्यती

पुणे। येत्या शनिवारी,10 ऑगस्ट व रविवारी 11 ऑगस्ट रोजी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) यांच्या तर्फे अश्वशर्यतींच्या यंदाच्या मोसमातील दोन अत्यंत रोमांचकारी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी आणि टर्फ क्लब ट्रॉफी या दर्जेदार शर्यतींमध्ये एकाहून एक सरस अश्वामधील चुरस अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

यातील शनिवारी होणार्‍या पहिल्या रंगतदार शर्यतीत द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या अश्वांमधील झुंज पाहता येणार आहे. ही शर्यत शनिवारी, 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून ही प्रतिष्ठेची शर्यत 15 फेब्रुवारी 1941 रोजी सर्वप्रथम सर व्हिक्टर ससून यांच्या हस्ते सुरु करण्यात आली होती. या शर्यतीत अत्यंत उच्च कामगिरीचा इतिहास असणार्‍या 4 वर्षे वयाच्या अश्वाचा सहभाग असून अश्वशर्यतींच्या विश्वात या रेसला महत्व आहे.

रविवारी होणार्‍या टर्फ क्लब ट्रॉफी या दुसर्‍या शर्यतीतही दर्जेदार अश्व आणि उत्तम जॉकी यात झुंज रंगणार आहे. रविवार 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार्‍या टर्फ क्लब ट्रॉफी या मोठा इतिहास असलेल्या शर्यतीतही उत्तम रितीने प्रशिक्षित केलेल्या अश्वांमध्ये चुरस रंगणार आहे. सर्वप्रथम मुंबई येथे 1947 मध्ये टर्फ क्लब कप या नावाने सुरु झालेली शर्यत अखेरच्या टप्प्यातील स्प्रिंटसाठी महत्वाची मानली जाते. 1400 मीटर अंतराच्या या शर्यतीला विशेष ग्रेडच्या शर्यतीचा दर्जा देण्यात आला आहे.