Video: जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पत्रकार परिषदेत बोलतो पत्रकाराच्याच फोनवर…

सिडनी।भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात आज(4 जानेवारी) दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 24 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनचा खेळकर स्वभाव पुन्हा पहायला मिळाला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराला आलेला फोन उचलून त्यावर पेनने समोरच्या व्यक्तीशी चक्क संवाद साधला आहे.

झाले असे की पत्रकार परिषदेवेळी पेनच्या टेबलवर असलेला फोन अचानक वाजू लागला. तो पाहून त्याने कोणाचा फोन आहे असे म्हणत तो फोन उचलला. मार्टीन या पत्रकाराचा तो फोन होता. त्याची संपादक समोरुन पेनशी बोलत होती. ज्यावेळी पेनने तो फोन उचलला त्यावेळी पत्रकारांना हसू आवरता आले नाही.

पेन फोन उचलल्यावर म्हणाला, ‘टिम पेन बोलतोय. कोण बोलत आहे. हाँगकाँगमधून किटी बोलत आहे. तूझे कोणाकडे काम आहे.’

‘ओह, मार्टीन, तो सध्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. त्याला मी सांगू का तूला परत फोन करायला?’

‘ठिक आहे मी त्याला त्याचे इमेल्स तपासायला सांगतो.’

पेनच्या या मजेदार वागणूकीमुळे पत्रकारांमध्येही हसू पसरले होते. पेनने फोन ठेवल्यानंतर मार्टिनला हसून त्याचे इमेल्स पहायलाही सांगितले.

पेनचा हा गमतीदार स्वभाव भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांदरम्यानही पहायला मिळाला होता. त्याने गमतीशीरपणे रिषभ पंतला स्लेज केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाचे टेंशन वाढले, वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात झाले या खेळाडूंचे पुनरागमन

Video: ‘तूला कंटाळा येत नाही का?’लायनचा पुजाराला प्रश्न

जगात कुणाला जे जमले नाही ते टीम इंडियाच्या २१ वर्षीय पंतने केले