प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणच दबंग

प्रो कबड्डीमध्ये आज घरच्या मैदानावर खेळताना पुणेरी पलटण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील पिछाडी भरून काढत दबंग दिल्ली संघावर ३४-३१ असा विजय मिळवला. या सामन्यात पुणेरी पलटणकडून दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल यांनी रेडींगमध्ये जबरदस्त कामगिरी करत विजयात मोलाची कामगिरी केली.

पहिल्या सत्रात सहाव्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ ४-४ असे बरोबरीत होते. त्यानंतर पुणेरी संघाचे दोन्ही रेडर दीपक हुड्डा आणि राजेश मंडल रेडींगमध्ये बाद झाले. ११ व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघाने अबोफझल याला सुपर टॅकल करत ७-६अशी बढत मिळवली.

सलग खेळाडू बाद होत गेल्यामुळे १७ व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघावर ऑल आऊट होण्याची नामुष्की ओढवली. ऑल आऊट झाल्यामुळे पुणेरी पलटण संघ १३-९ असा पिछाडीवर पडला. पहिले सत्र संपले तेव्हा दिल्ली संघ १४-१० असा आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुड्डाने सामन्याची सूत्र पाहत घेतली आणि सलग रेडींगमध्ये गुण मिळवत पिछाडी भरून काढण्याचे उत्तम काम केले. तरी देखील दुसऱ्या सत्रातील १२ मिनिटांचा खेळ झाला तेव्हा पुणेरी पलटण १७-२१ अशी पिछाडीवर होती.

सामना संपण्यास सहा मिनिटे शिल्लक होते तेव्हा राजेश मंडल याने सुपर रेड करत सामना २४-२४ असा बरोबरीत आणला. त्यानंतरच्या रेडमध्ये अबोफझल बाद झाल्याने दबंग दिल्ली ऑल आऊट झाली आणि पलटणने २७-२५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दीपकने सुपर रेड करत ३०-२५ आघाडी वाढवली.

शेवटच्या काही मिनिटात अतिशय रोमांचित झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणने दबंग दिल्लीचा ३४-३१ असा पराभव केला.