दुसरा टी२० सामना: भारताला आज मालिका विजयाची संधी

राजकोट। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताने आज विजय मिळवल्यास भारत ही मालिकाही जिंकेल.

१ नोव्हेंबरला दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५३ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजी चांगलीच बहरली होती. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनीही ८० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. ज्यामुळे भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा गाठला होता.

हा सामना भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारतीय संघाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विजयी निरोप दिला.

न्यूझीलंड संघही आजचा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. असे झाल्यास मालिका १-१ अशी बरोबरीची होईल.

तसेच आजच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला एक मोठा विक्रम करता येणार आहे. जर धोनीने या सामन्यात ३१ धावा केल्या तर तो भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ५०० धावा करणारा केवळ दुसरा खेळाडू बनणार आहे. याआधी असे विराट कोहलीने केले आहे.

त्याचबरोबर ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ७००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्यासाठी कर्णधार विराटला केवळ १० धावांची गरज आहे.