मॅन्चेस्टर डार्बी मध्ये ठरणार विजेतेपदाचा प्रमुख दावेदार

आज प्रिमियर लीगच्या गुणतालीकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मॅन्चेस्टरच्या २ संघांचा सामना आहे. मॅन्चेस्टर डार्बी म्हणून प्रसिद्ध असलेला सामना आज युनाएटेडच्या घरच्या म्हणजेच ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवला जाणार आहे.

इतिहास युनाएटेडच्या तर वर्तमान स्थिती सिटीच्या बाजूने आहे. आजच्या सामन्याचा विजेता संघ प्रिमियर लीगच्या विजेतेपदाची दावेदारी मजबूत करेल.

सिटी प्रिमियर लीगच्या गुणतालिकेत १५ सामन्यात १४ विजय आणि १ सामना बरोबरीत सोडवत ४३ गुणांसह पहिल्या तर युनाएटेड १५ सामन्यात ११ विजय २ पराभव तर २ सामने बरोबरीत सोडवत ३५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सिटीने ४६ गोल्स आणि युनाएटेडने ३५ गोल्स केले आहेत तर सिटीवर १० आणि युनाएटेड वर ९ गोल्स प्रतिस्पर्धी संघाने केले आहेत.

युनाएटेडचा स्टार मिडफिल्डर पोगबाची अनुपस्थिती सिटीसाठी फायद्याचे ठरू शकते तर सिटी तर्फे जोन्स खेळणार नाही. मागील ४० सामन्यांपासून युनाएटेडने घरच्या मैदानावर पराभवाचे तोंड पाहिले नाही तर सिटीने ६ एप्रिल नंतर प्रिमियर लीग मध्ये पराभव पाहिला नाही.

युनाएटेच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक अवे गोल्सचा विक्रम सुद्धा सिटीच्या नावावर आहे. त्यांनी २७ गोल्स केले आहेत. युनाएटेडचा गोलकीपर डीगेने ५३ आणि सिटीची गोलकीपर एडरसनने २० सेव्ह केले आहेत.

आजच्या सामन्यातला विजय युनाएटेडला सिटीच्या ३ गुण जवळ घेऊन जाईल आणि त्यांच्यांत ५ गुणांचा फरक राहील तर सिटीला विजय ११ गुणांची बढत मिळवून देईल.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)