सचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत घेणारे जेष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन

मुंबई । ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. आज त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. त्यातील सर्वात महत्वाची आठवण म्हणजे या दिग्गज अभिनेत्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची १९८८ साली घेतलेली मुलाखत.

या महान कलाकाराने क्रीडा जगतातील आजपर्यंतची सर्वात महत्चाची मुलखात १९८८ साली घेतली होती आणि ती होती अर्थात महान क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची. तेव्हा क्रिकेट जगतातील कुणालाही याचा अंदाजही नव्हता की सचिन पुढे जाऊन एवढे विक्रम करेल.

१५ वर्षीय सचिनला टॉम अल्टर यांनी वेस्ट इंडिज दौरा आणि देशांतर्गत क्रिकेट यावर अनेक प्रश्न विचारले होते. मुंबई संघाबरोबर सराव करत असलेल्या सचिनची ओळख त्यावेळी मुंबई रणजी संघाचे कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी अल्टर यांच्याशी करून दिली होती.

सचिनची जेव्हा ही मुलाखत झाली तेव्हा सचिनने नुकतेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करून गुजरात संघाविरुद्ध शतक केले होते.सचिनची ही पहिली विडिओ मुलाखत होती.

पुढे एका मुलाखतीमध्ये अल्टर म्हणाले होते की तो छोटा मुलगा अतिशय आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांना उत्तरे देत होता. अतिशय लाजाळू परंतु मितभाषी असा तो सचिन होता.

टॉम अल्टर हे एक क्रिकेटप्रेमी होते आणि त्यांना क्रिकेटर म्हणून कारकीर्द करायची होती. ते क्रिकेटवर कॉलम लिहीत असत.

पहा टॉम अल्टर यांनी घेतलेली सचिनची पहिली मुलाखत