पृथ्वी शॉची टीम इंडिया आज रचणार का इतिहास?

उद्या १९ वर्षांखालील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांना त्यांचा चौथा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची कामगिरी उत्तम झाली आहे. भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. तर ऑस्ट्रलियाने साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताकडून १०० धावांनी पराभव स्वीकारला होता. मात्र त्यानंतर त्यांनी चांगली कामगिरी केली होती. आता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

भारताने या आधी उपांत्य सामन्यात पाकिस्तानला आणि ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. भारतीय संघातून शुभमन गिल चांगलाच फॉर्ममध्ये खेळत आहे, आत्तापर्यंत त्याने ३ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. त्यामुळे ऑस्ट्रलिया गोलंदाजांसमोर उद्या त्याला रोखण्याचे आव्हान असेल. त्याच्या बरोबरच भारतीय कर्णधार पृथ्वी शॉची देखील कामगिरी उत्तम झाली आहे.

भारतीय गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना निष्प्रभ केले आहे. असे असले तरी उद्याही अशीच कामगिरी बजावण्याचे आव्हान त्यांच्या समोर असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आजपर्यंत प्रत्येकी ३ वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे उद्या जो संघ विजय मिळवेल तो सर्वाधिक वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा संघ ठरणार आहे. भारतीय संघाने २०००, २००८ ,२०१२ साली आणि ऑस्ट्रेलियाने १९८८, २००२, २०१० साली विश्वचषक जिंकला आहे.

२०१६ ला झालेल्या विश्वचषकातही भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्यांना विंडीज संघाकडून पराभव मिळाला होता. त्यावेळीही या भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड होता. यावर्षी सलग दुसऱ्यांदा त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.