हे आहेत प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील पाच सर्वोत्तम अष्टपैलू !!!

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात गुजरात फॉरचून जायन्टसला पटणा पायरेट्सने ५५-३८ असे पराभूत करत सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीचा चषक आपल्या नावे केले आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला पटणाचा कर्णधार प्रदीप नरवाल. त्याने अंतिम सामन्यात आपला खेळ उंचावून १९ गुण मिळवले. प्रदीपने या मोसमात एकूण ३६९ गुण मिळवले आहेत.

पटणाला दोन्ही साखळी सामन्यात गुजरातकडून हार मिळाली होती. अंतिम सामन्यात गुजरातला पराभूत करत त्याची पटणाने परतफेड केली. प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा रेडर्सचा मोसम ठरला. या मोसमात सर्व संघातील रेडर्सनी उत्तम कामगिरी केली. परंतु फक्त रेडर्सच्या बळावर सामने जिंकता येत नाही त्याला डिफेंडर्स आणि अष्टपैलू खेळाडूंची साथ लागते.

पाहुयात कोण आहेत या मोसमातील पाच सर्वोत्तम अष्टपैलू कबड्डीपटू.

५.मेराज शेख (दबंग दिल्ली)

दबंग दिल्लीने या मोसमात मिराज शेख या अष्टपैलू खेळाडूला संघात राखून ठेवले होते. तसेच यावर्षी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देखील मेराजकडेच होती. पण त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली सपशेल अपयशी ठरली आणि दिल्लील २२ सामन्यात फक्त पाच सामने जिंकता आले.

मेराज शेख पहिल्या काही सामन्यात लयीत नव्हता. स्पर्धेच्या दुसर्या टप्प्यात तो लयीत परतला. त्याने २० सामन्यात १०४ गुण मिळवले त्यातील ९६ रेडींग गुण होते. ज्या ५ सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. त्या पाचही सामन्यात मेराज शेखने चांगली कामगिरी केली आहे.

रेडींगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मेराज शेखने डिफेन्समध्ये चांगली कामगिरी केली नाही. त्याने या मोसमात डिफेन्स मध्ये फक्त ४ गुण मिळवले.

४.नितिन रावल (जयपूर पिंक पँथर्स)

जयपूर पिंक पँथर्ससाठी हा मोसम निराशेचा ठरला आहे. त्यांना प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करता आली नाही.पँथर्ससाठी चांगली बाब म्हणजे संघाला या मोसमात दोन मौल्यवान खेळाडू मिळाले. एक म्हणजे रेडर पवन कुमार आणि दुसरा म्हणजे अष्टपैलू खेळाडू नितीन रावल.

नितीन रावलने पाचव्या मोसमात एकूण ८५ गुण मिळवले रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही आघाड्यावर नितीन रावलने चांगला खेळ केला. नितीनने रेडींगमध्ये ६५ गुण मिळवले तर टॅकल मध्ये २० गुण मिळवले.

नितीनचा हा प्रो कबड्डीचा पहिलाच मोसम होता. हरियाणा स्टिलर्स विरुद्धच्या बरोबरीत सुटलेल्या सामन्यात नितीनने १२ गुण मिळवले होते आणि तो सामन्याचा मानकरी देखील ठरला होता.

३.विजय (पटणा पायरेट्स)

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात पटणा पायरेट्स हा सर्वोत्तम संघ म्हणून उदयास आला आहे. पटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने रेडींगमध्ये सर्वाधिक गुण मिळवत संघाला प्रत्येक सामन्यात भक्कम स्थितीत आणून ठेवले होते. पण कबड्डीतील सामने फक्त रेडर्सच्या बळावर जिंकता येत नाहीत.

पटणा पायरेट्सला एका अष्टपैलू खेळाडूची गरज होती आणि ती गरज विजयने पूर्ण केली. २० वर्षीय विजयने डिफेन्स बरोबरच रेडींगमध्येही चांगली कामगिरी केली. शेवटच्या चार सामन्यांमध्ये विजयाने एकूण १९ गुण मिळवले ज्यात अंतिम सामन्यातील ७ गुणांचा देखील समावेश आहे.

२.संदीप नरवाल (पुणेरी पलटण)

पुणेरी पलटणचा स्टार ऑलराउंडर आणि संपूर्ण प्रो कबड्डी इतिहासातील एक मोठा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा संदीप नरवाल याने पुणेरी पलटणला दुसऱ्या एलिमनेटर पर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

राइट कॉर्नरवर खेळताना संदीप नरवालने पुण्याच्या डिफेन्सला मजबुती दिली. त्याचबरोबर रेडिंगमध्ये ही त्याने संघाला गरज असताना गुण मिळवले. संदीप नरवालने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात २१ सामने खेळले ज्यात त्याने ५२ डिफेन्स गुण कमावले.

१.दीपक निवास हुडा (पुणेरी पलटण)

पुणेरी पलटण संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली ती कर्णधार दीपक निवास हुड्डा याने. प्रमुख रेडर म्हणून दीपक निवास हुड्डाने चांगली कामगिरी केली आणि त्याने डिफेन्समध्येही हातभार लावला.

गिरीश एर्नेक, संदीप नरवाल, धर्मनाथ चिरलाथन या सारखे प्रमुख डिफेंडर संघात होते पण हे मॅटवर नसताना दीपकने डिफेन्समध्ये चंगली कामगिरी केली.

या २३ वर्षीय अष्टपैलू कबड्डीपटूने २४ सामन्यात १८६ गुण कमावले ज्यातील १७२ रेड गुण होते.