हे आहेत वनडेतील या २०१७मधील टॉप ५ भारतीय फलंदाज

भारतीय संघाचे यावर्षीचे सर्व सामने पार पडले आहेत. यावर्षी भारताने २९ वनडे सामने खेळले आहेत. यातील २६ वनडेत विराट कोहलीने नेतृत्व केले आहे तर नुकतेच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या ३ वनडे सामन्यात विराटने घेतलेल्या विश्रांतीमुळे रोहित शर्माने नेतृत्व केले.

भारताने खेळलेल्या २९ वनडेत २१ सामने जिंकले आहेत, तसेच ७ सामन्यात पराभव स्वीकारला आहे आणि एका सामन्याचा निर्णय लागला नाही.

यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये विराट कोहली अव्वल आहे. त्याच्यापाठोपाठ भारताचा सलामीवीर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

याबरोबरच भारताकडून २९ पैकी २९ वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त एमएस धोनी आहे. त्याच्या पाठोपाठ हार्दिक पंड्याने २८ सामने खेळले आहेत.

यावर्षी २३ खेळाडूंना भारताकडून वनडेत खेळण्याची संधी मिळाली. यातील टॉप ५ फलंदाज:

१. विराट कोहली: यावर्षी विराटने २६ सामन्यात खेळताना ७६.८४ च्या सरासरीने १,४६० धावा केल्या आहेत. यात त्याने ६ शतके आणि ७ अर्धशतके केले आहेत. तसेच १३१ ही त्याची या वर्षातली वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. विराट २६ सामन्यात खेळताना ७ वेळा नाबाद राहिला आहे.

याबरोबरच विराटने या सर्व सामन्यात संघाचे नेतृत्वही केले आहे. तो फक्त काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती घेतल्यामुळे खेळला नाही. या दरम्यानच त्याने अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर लग्न केले आहे.

२. रोहित शर्मा: विराटच्या पाठोपाठ सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने यावर्षी २१ वनडे सामने खेळले आहेत. तो यावर्षी काही काळ दुखापतीने त्रस्त होता त्यामुळे त्याला ८ सामन्यांना मुकावे लागले होते.

रोहितने यावर्षी २१ सामन्यात खेळताना ७१.८३ च्या सरासरीने १२९३ धावा केल्या आहेत. त्याने यात ६ शतके आणि ५ अर्धशतके केली आहेत. तसेच श्रीलंकेविरुद्ध विक्रमी द्विशतकही झळकावले आहे. हे त्याचे वनडेत तिसरे द्विशतक ठरले होते. त्याने १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी रचली होती.

याबरोबरच रोहितने यावर्षी विराटच्या गैरहजेरीत संघाची प्रभारी कर्णधार म्हणून धुराही सांभाळली आहे.

३. शिखर धवन: भारताचा आक्रमक फलंदाज शिखर धवनने यावर्षी २२ वनडे सामने खेळले आहेत. तो यावर्षी भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर तर एकूण फलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

शिखरने यावर्षी २२ सामन्यात खेळताना ३ शतके आणि ६ अर्धशतकाच्या साहाय्याने ४८ च्या सरासरीने ९६० धावा केल्या आहेत. याबरोबरच शिखरने वनडे कारकिर्दीत ४००० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे.

४. एमएस धोनी: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने या वर्षी भारताने खेळलेल्या २९ पैकी २९ सामन्यात खेळताना २२ डावात ६०.६१च्या सरासरीने ७८८ धावा केल्या आहेत. यामध्ये इंग्लंडविरुद्ध केलेल्या शतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने यावर्षी ६ अर्धशतकेही केली आहेत.

याबरोबरच धोनी २२ डावात खेळताना ९ वेळा नाबाद राहिला आहे. वनडेत यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये धोनी बाराव्या तर भारतीय फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

धोनीने यावर्षीच्या सुरवातीलाच जानेवारी महिन्यात कर्णधारपद सोडले होते. त्याने याआधीच डिसेंबर २०१४ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो भारताकडून फक्त वनडे आणि टी २० सामने खेळतो.

५. अजिंक्य रहाणे: यावर्षी रहाणेला हवी तशी संधी मिळाली नाही. तरीही त्याने यावर्षीच्या भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याला रोहित शर्मा किंवा शिखर धवन संघाच्या बाहेर असताना भारताकडून सलामीला येण्याची संधी मिळाली आहे.

यावर्षी १२ सामन्यात खेळताना रहाणेने १ शतक आणि ७ अर्धशतकांसह ४८.८३ च्या सरासरीने ५८६ धावा केल्या आहेत. १०३ धावा ही त्याची या वर्षातली सर्वोच्च वनडे धावसंख्या आहे.