हे ५ भारतीय खेळाडू घेऊ शकतात पुढील १वर्षात निवृत्ती

भारतीय टी२० संघातील अनुभवी जेष्ठ सदस्य आशिष नेहरा पुढील महिन्यात आपला शेवटचा सामना दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळणार आहे. न्यूजीलँड विरुद्धचा हा तीन टी२० सामन्यांपैकी पहिलाच सामना असून नेहराचा तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे.

याबरोबर भारतीय संघातील अनेक अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाली आहे. त्यातील काही ठळक खेळाडू

१. युवराज सिंग

सध्या भारतीय संघाच्या बाहेर असलेला युवराज सिंग हा यावर्षी निवृत्त्त होऊ शकतो. सध्या या खेळाडूचे वय ३५ वर्ष आणि ३०३ दिवस आहे. सध्या भारतीय संघात नसलेल्या परंतु निवृत्ती न घेतलेल्या खेळाडूंमध्ये युवराज हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. भारतासाठी अनेक मर्यादित षटकांचे सामने एकहाती जिंकून देणारा खेळाडू अशी या दिग्गजांची ओळख आहे.

फिटनेसमध्ये हा खेळाडू आजकाल कमी पडत आहे. भारतीय संघाच्या निवड समितीच्या नवीन धोरणानुसार फक्त कौशल्य असून चालत नाही तर फिटनेसही तेवढाच महत्त्वाचा आहे. ह्याच कारणामुळे यो-यो फिटनेस टेस्टमध्ये युवराज फेल झाला आणि संघातील स्थान गमावून बसला. युवराज ज्या जागी खेळतो त्याजागी आता ४-५ खेळाडू रांगेत उभे आहे. २०१९ चा विचार करता युवराजला यापुढे संघात स्थान मिळणे तसे कठीण दिसते. त्यामुळे हा दिग्गज कोणत्याही क्षणी निवृत्ती घोषित करू शकतो.

२. हरभजन सिंग
एकेकाळी कुंबळेचा वारसदार म्हणून या खेळाडूंकडे पहिले जात होते. भारतात जे तीन गोलंदाज १०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत त्यात भज्जीचा समावेश होतो. हरभजनने १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून दुसरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज होण्यासाठी त्याला केवळ १८ विकेट्सची गरज आहे परंतु या खेळाडूला ऑगस्ट २०१५नंतर भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही.

सध्याची तरुण गोलंदाजांची फळी पाहता हरभजनला निवृत्तीचा सामना तरी खेळायला मिळेल की नाही इथपर्यंत शंका आहे. अश्विन आणि जडेजा हे गोलंदाज कसोटीत तर अक्षर पटेल, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अश्विन आणि जडेजा सारख्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवले जाते तर भज्जीला कधी संधी मिळणार हा प्रश्न राहतो. हाही खेळाडूला यावर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

३.गौतम गंभीर
भारताकडून २४०हुन अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या खेळाडूला आज भारतीय संघात स्थान देण्यात येत नाही. देशांर्तगत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही हा खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडतो आहे. केकेआर संघाचा कर्णधार असणारा हा खेळाडू आयपीएल देखील गाजवत आहे.

गंभीरला गेल्या दोन वर्षात कसोटी आणि टी२० सामन्यात संधी देण्यात आली होती. परंतु ती संधी त्याला सलग देण्यात आली नाही आणि गंभीरलाही त्यात चमक दाखवता आली नाही. सध्या भारतीय संघात ४ पूर्णवेळ सलामीवीर आहे. त्यात अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या खेळाडूंचा फॉर्म. हे सर्व खेळाडू सध्या जबदस्त कामगिरी करत आहे. शिवाय वय हा मुद्दाही त्यांच्या बाजूने आहे. गंभीरचे सध्याचे वय ३६वर्ष असून त्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे तोही निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो.

४.युसूफ पठाण

२०१७च्या रणजी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात ह्या खेळाडूने दोन्ही डावात शतकी खेळी करून आपल्या नावाचं विचार करायला लावला आहे. भारताकडून ५७ वनडे आणि २२ टी२० सामने खेळला आहे. युसूफ ३० मार्च २०१२ रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. सध्याचा भारतीय संघ पाहता युसूफला संधी मिळणे अवघड आहे आणि मिळाली तरी त्याची संघातील भूमिका काय असेल हे सांगणे अवघड आहे. युसूफ सध्या ३५वर्षांचा असून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि आपली क्रिकेट अकादमीवर लक्ष केंद्रित करू शकतो.

५. अमित मिश्रा
अमित मिश्रा भारतीय संघाकडून खेळलेला एक चांगला गोलंदाज आहे. मोठी प्रतिभा असूनही या खेळाडूला राष्ट्रीय संघात सलग संधी देण्यात आली नाही. टी२०मध्ये १५ आणि वनडेत २३ ची जबदस्त सरासरी असताना या खेळाडूचा राष्ट्रीय संघात विचार होत नाही. मिश्रा फेब्रुवारी महिन्यात शेवटचा आतंरराष्ट्रीय सामना खेळला असून सध्या मिश्राचे वय ३५वर्ष आहे. त्यामुळे हा खेळाडू यापुढे आतंराष्ट्रीय सामना खेळेल की नाही यात शंका आहे.