टॉप ५: यावर्षी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारे फलंदाज !

भारतीय क्रिकेट संघ २०१७मध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १० तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली १ असे एकूण ११ कसोटी सामने खेळला. यात भारतीय संघाने ७ सामन्यात विजय मिळवला असून एकमेव कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाकडून पुण्यातील एकमेव कसोटी सामन्यात यावर्षी पराभूत झाला. ३ सामने ड्रॉ राहिले. त्यात श्रीलंका संघाबरोबर कोलकाता आणि दिल्ली कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

यावर्षी भारताकडून ११ पैकी ११ कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान सहा, आर अश्विन आणि अजिंक्य रहाणेचा समावेश आहे तर विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि उमेश यादव १० कसोटी सामने खेळले आहेत.

यावर्षी भारतीय संघाकडून १९ खेळाडूंना कसोटीत फलंदाजी करायची संधी मिळाली. त्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ५ फलंदाजांची ही यादी

१. चेतेश्वर पुजारा (धावा- ११४०)
भारताकडून यावर्षी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा ११ पैकी ११ सामने खेळला. त्यात त्याने १८ डावात फलंदाजी करताना ६७.०५च्या सरासरीने ११४० धावा केल्या. त्यात त्याच्या ४ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १८ पैकी ९ डावात पुजाराने कमीतकमी ५० धावा केल्या आहेत हे विशेष. पुजारा यावर्षी कसोटीत तब्बल २४८४ चेंडू देखील खेळला आहे.

यावर्षी तो कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या जागतिक फलंदाजांमध्ये अव्वल आहे. पुजाराला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळत नसल्याने हा क्रिकेटपटू काउंटी आणि रणजी स्पर्धातही यावर्षी खेळला. त्यातही त्याने चांगली कामगिरी केली.

२.विराट कोहली (धावा- १०५९)
विराट कोहलीसाठी हे वर्ष अनेक अर्थांनी खास ठरले. विराट कोहलीने यावर्षी सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. ११ पैकी धरमशाला येथे ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेला कसोटी सामना त्याला दुखापतीमुळे खेळता आला नाही. विराटला यावर्षी अगदी सुरुवातीपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जे यश मिळाले तसे कसोटीत मिळाले नाही. परंतु त्याने याची भरपाई शेवटच्या काही कसोटी सामन्यात भरून काढली.

विराटने यावर्षी १० कसोटी सामन्यात १६ डावात फलंदाजी करताना १०५९ धावा केल्या. ज्यात ५ शतके आणि केवळ १ अर्धशतकाचा समावेश आहे. त्याच्या ह्यावर्षी केलेल्या ५ षटकांपैकी ३ द्विशके आहेत. विराटने १०५९ धावा करताना केवळ १३८९ चेंडू घेत कसोटी क्रिकेट अगदी मर्यादित षटकांच्या क्रिकेटप्रमाणे खेळले.

३.केएल राहुल (धावा- ६३३)
केएल राहुलला यावर्षी त्याने २०१६मध्ये केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नसली तर एक पूर्णवेळ कसोटी सलामीवीर म्हणून एकप्रकारे २०१७ने त्याला मान्यता दिली आहे. मुरली विजय आणि यावर्षी कसोटीत सलामीवीर म्हणून चमकदार कामगिरी करणाऱ्या शिखर धवन प्रमाणेच त्याने ह्यावर्षी कामगिरी केली. धवन आणि विजय हे सरासरीमध्ये जरी राहुलपुढे असले तरी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मुरली विजयबरोबर एक पूर्णवेळ सलामीवीर म्हणून राहुलला प्राधान्य दिले जाईल ते ह्याच वर्षीच्या कामगिरीवर.

राहुलने ह्यावर्षी ९ सामन्यात ४८.६९च्या सरासरीने ६३३ धावा केल्या. त्यात त्याने १४ डावात फलंदाजी करताना तब्बल ९ अर्धशतके केली आहेत. त्याचा सर्वधिक स्कोर यावर्षी राहिला ९०. त्याला यावर्षी अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करण्यात मोठे अपयश आले नाहीतर त्याच्या कामगिरीकडेही विराट, पुजाराच्या कामगिरीसारखेच पाहिले गेले असते.

४.अजिंक्य रहाणे (धावा- ५५४)
यावर्षी या मुंबईकर खेळाडूसाठी सुरुवातीचे महिने जेवढे चांगले राहिले तेवढेच वाईट वर्षाच्या शेवटचे काही महिने राहिले. ज्या क्रिकेटच्या प्रकारात आपण चांगली करत आहे, ज्यामुळे आपल्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघात पूर्णवेळ संधी देण्यात यावी अशी चर्चा होत होती त्याच प्रकारात ह्या खेळाडूने शेवटच्या काही सामन्यात कच खाल्ली.

आंतरराष्ट्रीय स्थरावर सोडाच रणजी सामन्यातही ह्या खेळाडूला धावा करताना झगडावे लागले. श्रीलंका संघाविरुद्ध कसोटी मालिकेत रहाणेने १, १०, २, ४ आणि ० अशा धावा केल्या तर मुंबईकडून खेळताना त्याने ०, ४५, ४९ आणि ० अशा धावा केल्या. तरीही या गुणवान खेळाडूला साथ दिली ती आधीच्या कसोटी सामन्यातील कामगिरीने.

रहाणेने यावर्षी ११ पैकी ११ सामने खेळताना १८ डावात ३४.६२च्या सरासरीने १०८४ धावा केल्या. त्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षी भारताकडून सार्वधिक चेंडू (१०८४) खेळणारा तो तिसरा खेळाडू आहे. याचा अर्थ तो खेळपट्टीवर खूप वेळा उभा राहूनही धावा जमवण्यात अपयशी ठरला.

५.शिखर धवन (धावा- ५५०) आणि मुरली विजय (धावा- ५२०)

भारतीय संघातील या दोन्ही सलामीवीरांनी जवळपास सारखीच कामगिरी केली. शिखराच्या कामगिरीच्या जोरावर त्याला दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या संघात स्थान देण्यात आले तर श्रीलंका संघाविरुद्ध कोलकाता कसोटीत आलेल्या अपयशांनंतर मुरली विजयचे मूल्य पुन्हा एकदा वधारले आणि मिळालेल्या संधीचे त्यानेही सोने केले.

शिखर धवनने यावर्षी ५ कसोटीत ८ डावात ६८.७५च्या सरासरीने २ शतके आणि २ अर्धशतकांच्या सहाय्यांने ५५० धावा केल्या तर मुरली विजयने ६ कसोटी सामन्यात १० डावात ५२च्या सरासरीने ३ शतके आणि १ अर्धशतकांच्या जोरावर ५२० धावा केल्या.