टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा झाल्याचे दिसत आहे. कऱ्हाड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य चाचणी स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. असे जरी असले तरी प्रो कबड्डीमधील कामगिरीही मोठ्या प्रमाणावर ध्यानात घेतली गेली असणार. त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या टॉप 5 खेळाडूंच्या प्रो कबड्डीमधील कामगिरीचा आढावा घेऊ.

रिशांक देवडिगा- ( कर्णधार)
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद मिळवणाऱ्या यु मुंबा संघातील हा महत्वाचा खेळाडू पाचव्या मोसमात युपी योद्धा संघाचा योध्दा झाला. यूपीला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात रिशांकने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

यु मुंबासाठी खेळत असताना त्याचे आणि कर्णधार अनुप कुमारचे सुत चांगलेच जमायचे. अनुपकुमारच्या नेतृत्व गुणाची झलक रिशांमध्येही दिसते. रिशांच्या कामगिरीवर महाराष्ट्राच्या संघाचे यश-अपयश अवलंबून असणार आहे.

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात खेळताना रिशांकने 21 सामन्यात एकुण 170 गुण मिळवले होते. त्यातील 165 गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले होते तर उर्वरित 5 गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले होते.

निलेश साळुंखे- (रेडर)
प्रो कबड्डीच्या मागील दोन मोसमात तेलुगु टायटन्ससाठी खेळताना निलेशने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रो कबड्डीचा पोस्टर बॉय राहुल चौधरी संघात असताना देखील निलेशची कामगिरी दखल घेण्याजोगी राहिली आहे. तो मोक्याच्यावेळी गुण मिळवण्यात सक्षम असून त्याच्याकडे स्वतःची वेगळी शैली आहे.

निलेशने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात 21 सामने खेळताना एकुण105 गुण मिळवले होते. त्यातील 98 गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले1 आहेत तर उर्वरित 7 गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले होते.

नितीन मदने-(रेडर)
प्रो काबाडीच्या पहिल्या मोसमात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या नितीनला त्यानंतर दुखापतीमुळे म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. पाचव्या मोसमात त्याला यु मुंबा संघाने करारबद्ध केले,परंतु संघात रेडींग विभागात अनेक पर्याय असल्याने त्याला फारशी संधी देण्यात आली नाही. नितीनला यु मुंबाने बदली खेळाडू म्हणून जास्त खेळवले. त्यामुळे त्याला या मोसमात भरीव कामगिरी करण्यात अपयश आले.

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात खेळताना नितीनने 12 सामन्यात एकूण 13 गुण मिळवले होते. त्यातील सर्व गुण रेडींगमधील आहेत. नितीन तांत्रिकदृष्ट्या खप सक्षम खेळाडू असून दडपणाखाली गुण मिळवण्यात त्याचा हातखंडा आहे. नितीनची निवड महाराष्ट्रच्या रेडींग विभागाला खूप बळकटी देते.

गिरीष इर्नाक- (लेफ्ट डिफेडर)
या मोसमात पुणेरी पलटण संघातील डिफेन्समधील सर्वात महत्वपूर्ण खेळाडू ठरलेल्या गिरीषची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या मोसमात खेळताना गिरिषने 21 सामन्यात 69 गुण मिळवले होते. त्यातील 64 गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले होते. या मोसमाच्या बेस्ट डिफेडर्सच्या गिरिषने 64 गुणांसह सहावे स्थान पटकावले होते. त्याच बरोबर प्रो कबड्डीच्या इतिहासात 172 गुणांसह बेस्ट डिफेडर्सच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.

सचिन शिंगाडे- (लेफ्ट कव्हर)
प्रो काबाडीच्या पाचव्या मोसमाचे विजेते ठरलेल्या पटणा पायरेट्स संघातील हा खेळाडू आहे. पटणाचा संघ म्हटले की डुबकी किंग प्रदीप नरवाल सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. या संघाला नेहमीच विजेतेपदाचे मुख्य दावेदार समजले जात होते. परंतु प्ले ऑफ जसे-जसे जवळ आले या संघाची कामगिरी खालावली आणि त्यामुळे या संघावर प्रश उपस्थित होऊ लागले. या संघाच्या डिफेन्समध्ये सर्वात कमकुवत संघ म्हणून संबोधले जाऊ लागले.

सचिन शिंगाडे याने आपली कामगिरी उंचावली आणि डिफेन्समधील बाकी खेळाडूंना प्रोत्साहित केले. एलिमीनेटरचे सामने आणि अंतिम सामन्यात डिफेन्समध्ये भरीव कामगिरी करत सचिनने पायरेट्सच्या विजयात मोलाची कामगिरी केली होती.

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात सचिनने 26 सामने खेळताना 22 गुण मिळवले आहेत, कव्हर म्हणून खेळताना केलेली कामगिरी खूपच जबरदस्त राहिली आहे.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

1- ऑक्टोबर 12 रिशांक देवडिगा रोजी प्रो कबड्डीमध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना जयपूर विरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने 28 रेडिंग गुण मिळवत एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम त्याने केला. पुढे हा विक्रम मोडला गेला.

2-प्रो कबड्डीमधून नावारूपाला आलेला स्टार खेळाडू काशीलिंग आडके याला महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळालेले नाही.

3- महाराष्ट्राच्या संपूर्ण संघाची यादी- रिशांक देवाडिगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे (पुणे), सचिन शिंगाडे(सांगली), गिरीश इर्नाक(ठाणे), विराज लांडगे(पुणे), नितीन मदने(सांगली), तुषार पाटील (कोल्हापूर), निलेश साळुंखे(ठाणे), ऋतुराज कोरवी(कोल्हापूर), सिद्धार्थ देसाई(पुणे), अजिंक्य कापरे(मुंबई शहर), रवी ढगे (जालना)

राखीव खेळाडू: अक्षय जाधव(पुणे), उमेश म्हात्रे(ठाणे), महेंद्र राजपूत(धुळे)