हे आहेत प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील ५ सर्वोत्तम रेडर्स !!!

प्रो कबड्डीचा पाचवा मोसम मागील चारही मोसमापेक्षा मोठा आणि उत्साहाने भरलेला होता. या मोसमात प्रो कबड्डीचे संपूर्ण वेळापत्रकच बदलून गेले होते. या मोसमात नवीन ४ संघांचा समावेश करण्यात आला होता. यूपी योद्धाज, गुजरात फॉरचून जायन्टस, हरियाणा स्टीलर्स आणि तमील थालाईवाज चार नवीन संघ होते. जुन्या प्रत्येक संघाला स्वतःच्या संघातील एक खेळाडू कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती.

प्रत्येक संघाने आपला प्रमुख रेडर राखून ठेवला आणि त्यामुळेच कुठल्याच संघाने आपल्या डिफेन्सकडे जास्त लक्ष दिले नाही. त्यामुळे हा मोसम हा डिफेंडरचा नसून रेडर्सचा होणार यात कुठलीच शंका उरली नव्हती. पाचव्या मोसमात बाराही संघांचा डिफेन्स परिपूर्ण नव्हता तर प्रत्येक संघात १ किंवा २ प्रमुख रेडर्स होते जे संघाला पुढे नेऊ शकतील.

यूपी योद्धा संघांमध्ये नितीन तोमर आणि रिशांक देवाडिगा या रेडर्सची जोडी होती तर बेंगळुरू बुल्स संघांमध्ये रोहित कुमार आणि अजय कुमार या दोघांची जोडी असे प्रत्येक संघात दोन किंवा तीन प्रमुख रेडर होते.

तर रेडर्सने गाजवलेल्या या पाचव्या मोसमात पाहुयात कोण आहेत पाच सर्वोत्तम रेडर्स.

५. मनिंदर सिंग (बेंगाल वॉरियर्स)
बेंगाल वॉरियर्स या संघाला रेडर मानिंदर सिंग कडून या वर्षी विशेष कामगिरीची अपेक्षा होती. बेंगाल वॉरियर्सचा संघ मागील चारही मोसमात त्यांच्या डिफेन्ससाठी प्रसिद्ध होता, पण या मोसमात असे दिसून आले नाही या मोसमात त्यांच्याकडे मनिंदर सिंह, जंग कुंग ली सारखे उत्तम रेडर्स होतो.
पहिल्या मोसमात उत्तम कामगिरी केल्यानंतर तीन मोसमात मनिंदर सिंग आपल्याला प्रो कबड्डीमध्ये दिसला नाही. त्यामुळे या मोसमात त्याला आपल्या कामगिरीची छाप सोडणे गरजेचे होते. कर्णधार सुरजित सिंगलाही मनिंदर सिंग वरच जास्त भरोसा होता.
रेडींग गुण- १९०
सरासरी- ७
सुपर १०- ९
सुपर रेड- ६

 

४. मोनू गोयत (पटणा पायरेट्स)
प्रत्येक संघात १ प्रमुख रेडर आणि १ दुसरा रेडर असा साचा असतो. पाटणा पायरेट्सकडे प्रमुख रेडर म्हणून प्रदीप नरवाल होता तर दुसरा रेडर म्हणून मोनू होता. संपूर्ण मोसमात दुसरा रेडर म्हणून सर्व उत्तम कामगिरी मोनू गोयत याने केली. जेव्हा प्रदीप नारवाल मैदानाबाहेर गेला तेव्हा त्याला मॅटवर परत आणण्याची जबाबदारी मोनूने घेतली, असे वेळोवेळी करत त्याने पटणाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.

प्रदीप नरवाल सारखा अफलातून रेडर जेव्हा संघात असतो तेव्हा दुसऱ्या रेडर्सची एक जबाबदारी असते ती म्हणजे जर प्रदीप नारवाल बाद झाल्यानंतर त्याला पुन्हा मॅटवर आणणे आणि ही कामगिरी मोनूने अत्यंत चोख पद्धतीने पार पाडली.
रेडींग गुण- १९१
सरासरी- ६
सुपर १०- ९
सुपर रेड- ४

३. अजय ठाकूर (तमिल थलाईवाज)
अजय ठाकूर हा तमिल थलाईवाज या नवीन संघाचा कर्णधार होता. पहिल्या काही सामन्यात अजय ठाकूरला लय गवसली नाही पण त्याने याची कसर शेवटच्या सामन्यांमध्ये काढली आणि प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात २०० पेक्षा अधिक गुण मिळवण्यात तो यशस्वी ठरला.

तामिल थलाईवाजकडे दुसरा मुख्य रेडर अनुभवाची कमी होती. के प्रपंजन हा त्यांचा दुसरा रेडर होता पण त्याच्याकडून तमिल ला सतत चांगली कामगिरी मिळत नव्हती. त्यामुळे रेडिंगची सर्व जबाबदारी ही फक्त आणि फक्त अजय ठाकूरवर आली होती आणि ती त्याने चोख पद्धतीने पार पाडली. तमिल थलाईवाजच्या घरच्या मैदानावरील सामन्यांमध्ये अजय ठाकूरने आपला खेळ वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आणि त्याने प्रत्येक सामन्यात सुपर१० केला.
रेडींग गुण- २१३
सरासरी- ८
सुपर १०- १२
सुपर रेड- ३

 

२. रोहित कुमार (बेंगलुरु बुल्स)
बेंगलुरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारकडे प्रो कबड्डीच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक रेड गुण मिळवण्याचा विक्रम काही काळ होता. रोहित कुमारने जवळजवळ प्रत्येक सामन्यात बेंगलुरु बुल्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली. पण त्याला त्याचा सहकारी अजय कुमार याची चांगली साथ लाभली नाही.

यूपी योद्धाज आणि बेंगळुरू बुल्स यांच्यामध्ये झोन बी मध्येतिसऱ्या क्रमांकासाठी चढाओढ चालू होती. पण बेंगलुरु बुल्स तिसऱ्या स्थानावर आपले नाव निश्चित करु शकले नाही आणि युपी योद्धा प्ले ऑफसाठी पात्र ठरले. त्यापुढील सामन्यात लगेचच युपी योद्धाला बेंगळुरु बुल्सने रोहित कुमारच्या तीस गुणांच्या कामगिरीच्या जोरावर प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजेच ४० गुणांच्या फरकाने हार दिली.

कर्णधार रोहित कुमारला जर अजय कुमारने चांगली साथ दिली असती तर नक्कीच बेंगळुरू बुल्स हे प्ले ऑफ साठी पात्र झाले असते. या मोसमात दोनशे रेड गुण मिळवणाऱ्या तीन खेळाडूंपैकी रोहित कुमार हा एक खेळाडू आहे.
रेडींग गुण- २१९
सरासरी- ९
सुपर १०- १२
सुपर रेड- १

 

१. प्रदीप नरवाल (पाटणा पायरेट्स)
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात प्रदीप आणि विक्रम हे समीकरण बनले आहे. प्रदीपने मिळवलेला प्रत्येक गुण एक तर विक्रमाच्या दिशेने एक पाऊल होते किंवा एक विक्रम होता. या मोसमात प्रदीप नरवालने दाखवून दिले की रेडर आपल्या संघाला एकहाती विजय कसा मिळवून देऊ शकतात.

प्रदीप नरवालने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात इतिहास घडवताना प्रो कबड्डीमधील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने या मोसमात ३६९ गुण मिळवले आहेत एवढेच नाही तर प्रो कबड्डीच्या इतिहासात त्याने एका रेडमध्ये सर्वाधिक म्हणजेच ६ टच गुण मिळविले आहेत. या मोसमातील नाही तर या संपूर्ण प्रो कबड्डीच्या इतिहासातील हा एक रेकॉर्ड आहे. प्रदीप नरवालने प्रो कबड्डीच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक गुणांचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. प्रदीप नरवालने या मोसमातील सर्व संघांविरुद्ध सुपर १० केला आहे. गुजरात या एकमेव संघाविरुद्ध त्याचा सुपर१० नव्हता तोही त्याने अंतिम सामन्यात १९ गुण मिळवून पूर्ण केला.
रेडींग गुण- ३६९
सरासरी- १०
सुपर १०- १९
सुपर रेड- १८