पाच कारणे ज्यामुळे भारतासाठी श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका का आहे महत्वाची?

डम्बुला: उद्यापासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान ५ एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अनेक कारणांनी महत्वाची ठरणार आहे.

भारतीय संघाने अनेक महत्वाच्या खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली आहे. त्यामुळे तरुण खेळाडू या मालिकेत चमकदार कामगिरी करून संघातील आपले स्थान पक्के करण्यासाठी नक्की प्रयत्न करतील यात शंका नाही.

या मालिकेत अनेक खेळाडूंवर विशेष नजरा असणार आहेत. त्यांची या मालिकेतील कामगिरी त्यांना २०१९च्या विश्वचषकाची दारे उघडणार आहेत. जाणून घेऊया का ही मालिका भारतासाठी महत्वाची आहे.

#१ एमएस धोनी
ज्यावेळी भारतीय संघाची या मालिकेसाठी निवड झाली त्यावेळी युवराज सिंग सारख्या दिग्गजाला संघात स्थान मिळाले नाही परंतु धोनीला मात्र भारतीय संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे धोनीलाच आता आपली निवड योग्य आहे हे दाखवून द्यावे लागणार आहे. तसेच आपण २०१९ च्या विश्वचषकात खेळणार किंवाब नाही याचा निर्णय या मालिकेनंतर घ्यावा लागणार आहे.

#२ सलामीवीरांचा प्रश्न
सध्या भारतीय संघाबरोबर ४ सलामीवीर खेळाडू आहेत. त्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा हे पूर्णवेळ सलामीवीर आहे तर अजिंक्य रहाणेकडे एक बॅकअप सलामीवीर म्हणून पहिले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा केएल राहुलही या मालिकेत आहे. ह्या मालिकेत कर्णधार कोहलीला या खेळाडूंना संधी देऊन कोणता खेळाडू कोणत्या जागी चांगली कामगिरी करतो याची चाचपणी करता येऊ शकते. कारण येणाऱ्या काळात कर्णधार कोहलीला कोणत्या खेळाडूला संधी द्यायची याबद्दल कठोर निर्णय घयावे लागणार आहेत.

#३ फिरकी गोलंदाज
सध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही एकदिवसीय मालिकेत मोठ्या प्रमाणावर चमक दाखवू शकले नसल्या कारणाने २०१९च्या विश्वचषकाला आपला विचार व्हावा असे जर सध्या स्थान दिलेल्या खेळाडूंना वाटत असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.

#४ वेगवान गोलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारे उमेश यादव आणि मोहम्मद शमी या दोन गोलंदाजांना या मालिकेत विश्रांती देऊन जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. २०१६च्या विंडीज दौऱ्यात शार्दूल ठाकूरची निवड होऊनही त्याला संधी देण्यात आली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या २६ वर्षीय खेळाडूला आजही भारतीय संघातून संधी देण्यात आली नाही. यावेळी मात्र या गोलंदाजाला राखीव खेळाडूंमध्ये ठेवून चालणार नाही. भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान मिळवून आता बरेच दिवस झाले आहेत. आता त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करताना या दौऱ्यात वरिष्ठ खेळाडूचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

#५ मधली फळी
युवराज सिंगला सलग दोन मालिकेत संधी देऊनही त्याला विशेष चंमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्याला संधी नाकारून मनीष पांडे आणि केएल राहुल या दोघांना संधी देण्यात आली आहे. त्यातही पहिले काही सामने केएल राहुल युवराजच्या जागी खेळेल. केएल राहुल या मालिकेत कशी कामगिरी करतो यावर त्याचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे भविष्य अवलंबून आहे. मनीष पांडेचीही तीच अवस्था आहे. जर संधी मिळाली तर मात्र मनीषसाठी चांगली कामगिरीच त्याच संघातील स्थान कायम करू शकते.