युवराजला भारतीय संघातून डच्चू मिळण्याची ५ कारणे

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि एकमेव टी-२० साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू युवराज सिंगला मात्र वगळण्यात आले.

सध्या एकदिवसीय सामने खेळत असणाऱ्या जगातील सर्व खेळाडूंपेक्षा युवराज सिंग हा अनुभवी आणि जेष्ठ खेळाडू आहे. युवराज तब्बल ३०४ सामन्यात भारतीय संघाचा भाग राहिला आहे. भारताकडून सार्वधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या फलंदाजच्या यादीत तो ५व्या स्थानी आहे. तरीही या खेळाडूवर ही वेळ का आली? एमएस धोनीसुद्धा बऱ्यापैकी फॉर्मशी झगडत असताना युवराजलाच का संघातून डच्चू देण्यात आला.

असंख्य कारणे आहेत. परंतु जी खऱ्या अर्थाने युवीला संघाबाहेर फेकण्यासाठी कारणीभूत ठरली ती….

#१ सुमार फॉर्म
युवराज सिंग हा अतिशय सुमार फॉर्ममधून जात आहे. भारतीय संघाबाहेर जाण्यासाठीच सर्वात महत्त्वाचं कारण हेच ठरलं आहे. गेल्या ८ सामन्यात युवराज सिंगने २७च्या सरासरीने १६२ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.
#२ वय
भारतीय एकदिवसीय संघातील खेळाडूंचे सध्याचे वय हे सरासरी २७-२९ वर्ष आहेत. युवराज सिंग आणि एमएस धोनी हे दोन खेळाडूंचे वय ३३ वर्षांपेक्षा जास्त आहे. संघाचा समतोल राखताना वय ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते.

#३ अनेक पर्याय
युवराज ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो त्या जागी दावा सांगणारे अनेक खेळाडू भारतीय संघात आहेत. ज्या चौथ्या क्रमांकावर युवराजने गेल्या दोन वर्षात १० सामने खेळले आहेत त्या जागी अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी करूनही दोन वर्षात फक्त ४ सामने खेळले आहेत. ५व्या क्रमांकावर युवराज सिंगपेक्षा अक्सर पटेल, सुरेश रैना, हार्दिक पंड्या आणि मनीष पांडे यांनी गेल्या दोन वर्षात चांगली कामगिरी केली आहे. तर एमएस धोनीने तब्बल ६२४ धावा गेल्या दोन वर्षात ५व्या स्थानी केल्या आहेत.
सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक अष्टपैलू खेळाडू घेऊन खेळणारा भारत हा एकमेव देश आहे. रवींद्र जडेजा, अक्सर पटेल, केदार जाधव, आर अश्विन, हार्दिक पंड्या यांच्यासारख्या तगड्या खेळाडूंची फळी भारताकडे आहे.
#४ २०१९ चा विश्वचषक
युवराज सिंगचे आंतरराष्ट्रीय पदार्पण २००० साली झाले. त्यानंतर युवराजने संघासाठी अनेक चांगल्या कामगिरी केल्या आहेत. परंतु गेली १९ वर्षात कधी नाही ते युवराजचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. २०१९ साली होणाऱ्या विश्वचषकात जर युवराजला खेळायचे असेल तर त्याला आपल्या फॉर्मबरोबर फिटनेस राखावा लागेल. युवराजचे सध्याचे वय हे ३६ वर्ष आहे. २०१९ पर्यंत ते ३८ वर्ष असेल. पुन्हा तो किती दिवस क्रिकेट खेळतो याची शाश्वती नाही.
त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन युवराजवर विश्वास टाकून नव्याने संघाची दारे ठोठावणाऱ्या खेळाडूंवर नक्कीच अन्याय करणार नाही. युवराजची जागा घेण्यासाठी आणि २०१९ च्या विश्वचषकात देशाकडून खेळण्यासाठी तब्बल ५-६ खेळाडू सध्या वाट पाहत आहेत.

#५ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाला लागलेली घरघर
युवराज सिंगकडे पाहिलं तर त्याच्या फलंदाजीपेक्षा कायम लक्षात राहते ते त्याचे चपळ क्षेत्ररक्षण. एकवेळ जागतिक क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणासाठी युवराजला नावाजले जायचे. परंतु या युवराजच्या स्पेसिऍलिटीलाही गेल्या ३-४ वर्षात घरघर लागली आहे. उपयुक्त गोलंदाज अशी ओळख असलेल्या युवराजने भारताकडून १११ बळी घेतले आहेत. जानेवारी २०१२ पासून युवराजने ३० सामन्यात गोलंदाजी केली आहे. त्यात त्याला केवळ २ बळी मिळवता आले आहेत. म्हणजेच क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या दोंन्ही विभागात युवराज मोठ्या प्रमाणावर फ्लॉप ठरला आहे.
सध्याच्या भारतीय संघातील खेळाडू हे मोठ्या प्रमाणावर क्षेत्ररक्षणात कष्ट घेऊन सुधारणा करत आहेत. त्यातूनच जडेजा, रहाणे, कोहली, धवन, राहुल सारखे चपळ क्षेत्ररक्षक भारतीय संघात आले आहेत. यात युवराज कुठे असेल हे सांगणे कठीण आहे.

सध्या क्रिकेट बरेच बदलले आहे. त्यात भारतीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर अष्टपैलू कामगिरी करणे हे क्रमप्राप्त झालं आहे. संघात जागा बनवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी सतत संघर्ष आहे. केएल राहुल, अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय हे दिग्गज कसोटीमध्ये जबदस्त कामगिरी करूनही त्यांना मर्यादित षटकांच्या सामन्यात जागा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. युवराज या खेळाडूंपेक्षा नक्कीच महान खेळाडू आहे. परंतु सध्याचा त्याचा एकंदरीत फॉर्म आणि बाकी गोष्टी पाहता त्याला संघात स्थान मिळणे हे कठीणच दिसते.