टॉप ५: भारताचे हे ५ खेळाडू आयपीएल लिलावात होऊ शकतात करोडपती

आयपीएल ११ व्या मोसमाच्या लिलावाच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातच यावेळचा लिलाव हा मोठा असणार आहे. या लिलावात अनेक भारतीय खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. यात युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग असे अनुभवी तर कुलदीप यादव, युजवेंद्र चहल असे तरुण खेळाडू आहेत.

त्यामुळेच भारताच्या अनेक खेळाडूंची बोली कोटींमध्ये लागण्याची शक्यता आहे. या लिलावात भारताचे एकूण ३६० खेळाडूंचा समावेश आहे.

भारताचे हे टॉप ५ खेळाडू जे आयपीएल लिलावात होऊ शकतात करोडपती:

मनीष पांडे(१०० लाख):

आयपीएलचे १०० पेक्षा जास्त सामने खेळलेल्या खेळाडूंपैकी एक असलेला मनीष पांडेवर यावर्षी आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष असणार आहे. परंतु मनीषची कामगिरी सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये खास झालेली नाही. मात्र त्याने भारताकडून खेळताना डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंका विरुद्ध चांगल्या खेळी केल्या होत्या.

मनीष आजपर्यंत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला आहे. तसेच त्याने १०३ सामन्यात २२१५ धावा केल्या आहेत.

याबरोबरच मनीषची दक्षिण आफ्रिका दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात निवड झाली आहे.

जयदेव उनाडकट(१५० लाख):

मागील वर्षी रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंपैकी जयदेव उनाडकट हा एक होता. त्यामुळे याही वर्षी त्याच्याकडे एक चांगला पर्याय म्हणून फ्रॅन्चायझींचे लक्ष असेल.

त्याने श्रीलंका विरुद्धही खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्याला श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी २० मालिकेसाठी मालिकावीर म्हणून पुरस्कारही मिळाला होता. तसेच त्याने यावर्षी रणजी ट्रॉफीत कर्नाटककडून खेळताना चांगली गोलंदाजी केली होती. त्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये ४७ सामन्यात ५६ बळी घेतले आहेत.

वॉशिंग्टन सुंदर(१५० लाख):

आयपीएलच्या १० व्या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने या वर्षभरात भारतीय संघातही स्थान मिळवले होते. त्याची या वर्षातली कामगिरी उत्तम झाली आहे.

तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता तसेच तो याच लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला होता. तसेच तो यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू संघाकडूनही खेळला आहे.

मागच्या वर्षी आयपीएलमध्ये त्याने रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाच्या अनेक विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

कुलदीप यादव (१५० लाख):

भारतीय संघात आता नियमित गोलंदाज बनलेला कुलदीप यादव यावर्षी आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने कायम न केल्याने, त्याला संघात घेण्यासाठी फ्रॅन्चायझींनीमध्ये चुरस बघायला मिळू शकते.

तसेच त्याची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना बंगाल विरुद्ध २६ धावा देऊन ४ बळी घेतले आहेत.

त्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना १५ सामन्यात १८ बळी घेतले आहेत.

युजवेंद्र चहल (२०० लाख):

२०१७ या वर्षात आंतराष्ट्रीय टी २० मध्ये युजवेंद्र चहल सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. त्यातच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला कायम न केल्याने अनेक फ्रँचायझी त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक असतील.

परंतु त्याला बंगलोर संघ राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा संघात घेऊ शकतात. पण अर्थातच त्यांना त्यासाठी काही कोटी रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. चहलचीही भारतीय संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघात निवड झाली आहे.

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव येत्या २७ आणि २८ तारखेला बंगलोरला होणार आहे.