टॉप ५: या ५ महाराष्ट्रीयन गोलंदाजांकडे असणार आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा मुख्य लिलाव या आठवड्यात २७ आणि २८ तारखेला बंगळुरूला होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या लिलावाकडे असणार आहे.

यावर्षीचा लिलाव मोठा असेल. तसेच या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंची नावे आहेत. यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन, ख्रिस गेल, उमेश यादव, युवराज सिंग यांचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वीच आयपीएलच्या मुख्य लिलावासाठी खेळाडूंची त्यांच्या बेस प्राईससह यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश आहे.

या यादीत २४४ कॅप खेळाडू, ३३२ अनकॅप खेळाडू आणि २ सहयोगी देशांचे खेळाडूंचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल संघांनी त्यांचे कोणते खेळाडू कायम ठेवले आहेत हे जाहीर केले. यात अनेक अनपेक्षित नावेही बघायला मिळाली .

या ५ महाराष्ट्रीयन गोलंदाजांवर असेल आयपीएल लिलावात लक्ष

डॉमनिक मूथ्यूस्वामी (२० लाख) : रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राकडून डॉमनिक मूथ्यूस्वामी खेळतो. त्याने सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने गुजरात विरुद्ध खेळताना ४ बळी तर बडोदा विरुद्ध खेळताना ३ बळी घेतले होते.

तसेच तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये ६ सामन्यात खेळताना त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत.

अक्षय वाखारे (२० लाख): या वर्षीच्या मोसमात रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ संघाकडून खेळलेल्या अक्षय वाखारेवर देखील यावर्षी सर्वांचे लक्ष असणार आहे. सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये मात्र त्याची कामगिरी फारशी चांगली झालेली नसली तरी त्याने रणजी ट्रॉफीत विदर्भाकडून चांगली कामगिरी केली होती.

धवल कुलकर्णी(५० लाख): जलदगती गोलंदाज असलेला धवल कुलकर्णीची यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी स्पर्धेतही त्याच्याकडून चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे.

तसेच त्याने यावर्षी रणजी स्पर्धेतही मुंबईकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती.

धवल मागच्या वर्षी गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. तसेच तो त्याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान संघाकडूनही खेळला आहे.

शार्दूल ठाकूर (७५ लाख): काही महिन्यांपूर्वीच आंतराष्ट्रीय पदार्पण केलेल्या शार्दूल ठाकुरचे हे पदार्पण तसे खास नव्हते. त्याला २ वनडे सामन्यात एकच बळी घेण्यात यश मिळाले. असे असले तरी त्याने मुंबईकडून खेळताना यावर्षीच्या रणजी मोसमात चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने आंध्रप्रदेशविरुद्धच्या सामन्यात एकूण ७ बळी घेतले होते.

तसेच आयपीएलमध्ये १३ सामन्यात शार्दुलने १२ बळी घेतले आहेत.

उमेश यादव (१००लाख): भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा यावर्षीच्या आयपीएल लिलावासाठी असलेल्या मोठ्या नावांपैकी एक नाव आहे. त्याने भारताकडूनही खेळताना चांगली कामगिरी केलेली आहे.

सध्या तो भारतीय संघाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळत आहे. त्याने आजपर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत ९४ सामन्यात ९१ बळी घेतले आहेत. तसेच तो याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे.