टॉप ५: ह्या ५ मराठी खेळाडूंवर असणार आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची त्यांच्या बेस प्राईससह यादी जाहीर झाली. हा लिलाव येत्या २७ आणि २८ तारखेला बंगळुरूमध्ये होणार असून या लिलावात एकूण ५७८ खेळाडूंवर बोली लागणार आहे.

या यादीत २४४ कॅप खेळाडू, ३३२ अनकॅप खेळाडू आणि २ सहयोगी देशांचे खेळाडूंचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल संघांनी त्यांचे कोणते खेळाडू कायम ठेवले आहेत हे जाहीर केले. यात अनेक अनपेक्षित नावेही बघायला मिळाली .

त्यामुळे आता लिलावासाठी आर अश्विन, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ अशा अनेक मोठ्या खेळाडूंचा पर्याय फ्रॅन्चायझींसमोर उपलब्ध असणार आहे. यात यादीत अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंचाही समावेश आहे.

या पाच महाराष्ट्रीयन खेळाडूंवर असेल आयपीएल लिलावात लक्ष:

धवल कुलकर्णी (५० लाख): जलदगती गोलंदाज असलेला धवल कुलकर्णीची यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफी स्पर्धेतही त्याच्याकडून चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे. तसेच त्याने रणजी स्पर्धेतही मुंबईकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती.

धवल मागच्या वर्षी गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. तसेच तो त्याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान संघाकडूनही खेळला आहे.

राहुल त्रिपाठी (२० लाख): मागील वर्षी रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीवर यावर्षीच्या लिलावात सर्वांचेच लक्ष असेल. आयपीएलच्या १० व्या मोसमात पुण्याच्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात राहुलचा मोलाचा वाटा होता. त्याने १४ सामन्यात ३९१ धावा केल्या होत्या.

तसेच त्याने यावर्षीच्या रणजी मोसमात पहिल्या दोन सामन्यांसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधापदही सांभाळले होते. महाराष्ट्राकडून खेळताना त्याने चांगली कामगिरीही केली.

केदार जाधव (२०० लाख) : भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळत होता. त्याची कामगिरी मागच्या आयपीएलमध्ये विशेष अशी नसली तरी त्याने भारताकडून खेळताना या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे.

भारतीय संघात केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरच त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. त्याचमुळे आयपीएल लिलावात केदारवर लक्ष असेल.

तसेच त्याला सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. 

पृथ्वी शॉ (२० लाख): न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात पृथ्वी शॉ भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने या स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिले आहेत. त्याने साखळी फेरीत झालेल्या तीन पैकी पहिल्या दोनही सामन्यात अर्धशतकी खेळी केली तर तिसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजीला यावेच लागले नाही.

त्याच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

पृथ्वीसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील यावर्षीचा मोसमही खास राहिला. त्याने मुंबईकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वानीच कौतुक केले आहे.

अजिंक्य राहणे (२०० लाख): मागील वर्षी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळलेल्या अजिंक्य रहाणेला यावर्षी त्याचा पूर्वीचा संघ राजस्थान रॉयल्स संघात कायम ठेवेल असे वाटले होते परंतु त्यांनी फक्त स्टिव्ह स्मिथला कायम केले.

त्यामुळे आता आयपीएल मुख्य लिलावात अजिंक्य रहाणे कोणत्या संघात जाणार की राजस्थान रॉयल्स संघ राईट टू मॅच कार्ड वापरून त्याला परत संघात घेणार का हे पाहावे लागेल.

सध्या रहाणे भारतीय संघाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. मात्र त्याला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या दोन्ही कसोटीत संधी देण्यात आली नव्हती.