क्रिकेटजगतातील ५ महान ‘वॉटरबॉय’

काल भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंना पाणी घेऊन जाताना दिसला. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या ह्या कृतीची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया प्रशंसा झाली. यापूर्वी अनेक खेळाडूंनी या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. आज आपण अश्या ५ महान खेळाडूंची ही कामगिरी पाहूया.

#५. युवराज सिंग
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ ऑगस्ट २०१० रोजी कोलंबो येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने ‘वॉटरबॉय’ म्हणून जबाबदारी पार पडली होती. यावेळी काही श्रीलंकन चाहत्यांनी युवराजची थट्टा केल्यामुळे तो भडकला होता. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात त्या वेळी युवराजला त्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नसल्या कारणाने त्याने ही जबाबदारी पार पडली होती.
हा सामना भारताने ५ विकेटने जिंकला होता.

#४. विराट कोहली

मार्च २०१७ मध्ये धरमशाला येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने ‘वॉटरबॉय’ची जबाबदारी पार पडली होती. दुखापतीमुळे विराट या सामन्यात खेळू शकला नाही. त्या वेळी त्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे भारताने हा सामना ८ विकेट्सने जिंकला होता.

 

#३. एमएस धोनी

एमएस धोनीने ‘वॉटरबॉय’ म्हणून जबाबदारी पार पाडलेला हा काही पहिलाच सामना नव्हता. यापूर्वीही त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे. काल बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराने ही जबाबदारी पार पडली. विशेष म्हणजे भारताने हा सामना २४० धावांनी जिंकला. धोनीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा ही जबाबदारी पार पडली आहे.

 

#२. सचिन तेंडुलकर 

२००४ साली भारताचा वंडर बॉय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बेंगलोर कसोटीमध्ये ‘वॉटरबॉय’ बनला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात दुखापतीमुळे सचिन खेळाला नव्हता. विशेष म्हणजे विरुद्ध टीममध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग सुद्धा खेळत नसल्याकारणाने कर्णधार म्हणून ऍडम गिलख्रिस्ट जबाबदारी पार पाडत होता. भारत ह्या सामन्यात तब्बल २४७ धावांनी पराभूत झाला होता.

 

#१. सर डॉन ब्रॅडमन

सार्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनीही ‘वॉटरबॉय’ची जबाबदारी पार पाडली आहे. १९२८ साली झालेल्या एका कसोटी सामन्यात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती.