पुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे…

आयपीएलच्या इतिहासात देशाची सांस्कृतिक शहर असलेलया पुण्याची टीम प्रथमच अंतिम फेरीत पोहचली. अतिशय खराब सुरुवात करूनही नंतरचे सामने अपेक्षेपेक्षाही चांगली खेळून पुण्याने अंतिम फेरीत गाठली. स्पर्धेत सर्वात जास्त सामने जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला पुण्याने ह्याच आयपीएलमध्ये ३ वेळा पराभूत केले. ह्या विजयात पुण्याकडून सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु त्यातील काही असे खेळाडू आहेत ज्यांनी अतिशय जबदस्त कामगिरी करून तसेच जबाबदारी घेऊन संघाला अंतिम फेरीत नेले. असे ५ खेळाडू…

#६ जयदेव उनाडकत
सौराष्ट्राकडून रणजीमध्ये खेळणारा आणि भारतीय संघाकडून ८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला २६ वर्षीय जयदेव उनाडकतच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर पुणे संघाच्या गोलंदाजी विभागाला एक बळकटी आली. यापूर्वी कोलकाता आणि बेंगलोरकडून खेळलेल्या उनाडकतने यावेळी पुण्याकडून खेळताना जबदस्त कामगिरी केली. ११ सामन्यांत खेळताना त्याने २२ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळविला. यात त्याची सरासरी होती १३.७७ शेवटच्या सामन्यात जर त्याने ३ बळी मिळवले तर पर्पल कॅपचाही तोच मानकरी ठरेल.

#५ इम्रान ताहीर
आयपीएल २०१७ ची बोली सुरु सुरु असताना जागतिक टी२० प्रकारात गोलंदाजीमध्ये पहिल्या स्थानावर असूनही इम्रान ताहीरला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पुण्याकडून आयपीएलमध्ये खेळणारा मिशेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यामुळे इम्रान ताहीरची त्याच्या जागी वर्णी लागली आणि त्याने ती किती योग्य आहे हे त्याने १२ सामन्यात खेळलेल्या कामगिरीने दाखवून दिले. १२ सामन्यात खेळताना ताहिरने १८ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक मिळविला.

#४ अजिंक्य रहाणे
एक मुंबईकर असून मुंबई विरुद्ध खेळलेल्या तीनही सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबईच्या गोलंदाजांवर असा काही बरसला की तो प्रत्येक सामन्यात एक कट्टर पुणेकर वाटत होता. मुंबई विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ६०, दुसऱ्या सामन्यात ३२ चेंडूत ३८ आणि कालच्या सामन्यात ४३ चेंडूत ५३ धावा रहाणेने केल्या. आणि हीच कामगिरी पुण्याला आयपीएलमधील वाटचालीसाठी महत्वाचे ठरले. रहाणेने ह्या आयपीएलमध्ये सर्व सामने अर्थात १५ सामन्यांत २४.१४ च्या सरासरीने ३३८ धावा केल्या आहेत.

#३ राहुल त्रिपाठी
अतिशय कमी किमतीत पुण्याने आयपीएल २०१७ मध्ये संघात समावेश केलेला खेळाडू अर्थात राहुल त्रिपाठी. परंतु या खेळाडूने अशी काही कामगिरी केली की तिची किंमत पैश्यात मोजणे कठीण. आज २०१७ च्या आयपीएलमध्ये सर्वांच्या तोंडावर ज्या एकाच खेळाडूचे नाव आहे ते म्हणजे राहुल त्रिपाठी. राहुल त्रिपाठीने १३ सामन्यांत खेळताना सलामीवीराची जबाबदारी अनुभवी राहणेबरोबर चोख बजावली. १३ सामन्यांत खेळताना त्रिपाठीने २९.८५ च्या सरासरीने ३८८ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८व्या क्रमांकावर झेप घेतली.

#२ स्टिव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची एमएस धोनीला हटवून जेव्हा पुण्याच्या कर्णधार पदावर नियुक्ती केली तेव्हा त्याच्या निवडीबद्दल जोरदार टीका झाली होती. परंतु ही निवड किती योग्य आहे हे त्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. लीड फ्रॉम फ्रंट अशी कामगिरी करत स्मिथ कर्णधार आणि खेळाडू अश्या दोनही आघाड्यांवर यशस्वी ठरला. स्मिथने १४ सामन्यांत ३८.५७ च्या सरासरीने तब्बल ४२१ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ५व्या क्रमांकावर झेप घेतली.

#१ बेन स्ट्रोक्स
एवढी किंमत देऊन बेन स्ट्रोक्सला संघात का घेतले असेल याचे उत्तर आयपीएलच्या पुण्याच्या पहिल्या काही सामन्यांत जरी मिळाले नसेल तरी त्याचे आज उत्तर नक्की सांगण्याचीही गरज भासणार नाही. अष्टपैलू कामगिरी कशी असते याच उत्तम उदाहरण त्याने घालून दिले. त्यामुळे साखळी सामन्यांनंतर जेव्हा तो मायदेशी परतला तेव्हा पुण्यासह सर्व क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त केली. ११ सामन्यांत ३१.६० च्या सरासरीने स्ट्रोक्सने ३१६ धावा करतानाच १२ बळी सुद्धा घेतले आहे.