अखिल भारतीय सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत पुण्याच्या राधिका महाजनला दुहेरी मुकुट

पाचगणी | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील अखिल भारतीय सुपर सिरीज् स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या राधिका महाजन हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, एकेरीत मुलांच्या गटात फैज नस्यामने, दुहेरीत सर्वेश बिरमाने व यशराज दळवी यांनी विजेतेपद पटकावले.
 
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत 16वर्षाखालील मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या राधिका महाजनने अव्वल मानांकित तेलंगणाच्या आदिती आरेचा टायब्रेकमध्ये 7-5, 7-6(3)असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 45मिनिटे चालला. राधिका हि विश्वकर्मा विद्यालय येथे नववी इयत्तेत शिकत असून फर्ग्युसन कॉलेज येथे प्रशिक्षक नंदन बाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सराव करते. तिचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. एकेरी गटाबरोबरच राधिका महाजनने हर्षिता बांगेराच्या साथीत श्रावणी खवळे व परी चव्हाण यांचा 6-2, 7-6(4)असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या फैज नस्यामने कर्नाटकाच्या पाचव्या मानांकित आयुश भटने 6-2, 6-4असा पराभव करून विजेतेपद मिळवले. फैज हा मुंबई येथे टीए म्हात्रे स्पोर्ट्स ग्राउंड येथे प्रशिक्षक बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत सर्वेश बिरमाने व यशराज दळवी या जोडीने अर्जुन गोहड व आयुश भट यांचा 6-3, 6-4असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण लगान व जोधा अकबरमधील अभिनेता अमिन हाजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:एकेरी: अंतिम फेरी: 16वर्षाखालील मुले:
फैज नस्याम(महा)(1)वि.वि.आयुश भट(कर्नाटक)(5)6-2, 6-4;
16वर्षाखालील मुली: राधिका महाजन(महा)(3)वि.वि.आदिती आरे(तेलंगणा)(1)7-5, 7-6(3);
 
दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले: सर्वेश बिरमाने/यशराज दळवी वि.वि.अर्जुन गोहड/आयुश भट 6-3, 6-4;
 
मुली: हर्षिता बांगेरा/राधिका महाजन वि.वि.श्रावणी खवळे/परी चव्हाण 6-2, 7-6(4).