तब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम

रविवारी (12 आॅगस्ट) इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध 1 डाव आणि 159 धावांनी मोठा विजय मिळवला.

या सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक 9 विकेट घेणाऱ्या जेम्स अँडरसनने आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. लॉर्ड्स कसोटीनंतर आयसीसीने सोमवारी ही कसोटी क्रमवारी घोषित केली.

अँडरसनने अव्वल स्थान मिळवताना लॉर्ड्स कसोटीतून 19 गुणांची कमाई करत 903 गुण मिळवले आहेत.

त्यामुळे तो कसोटी क्रमवारीत 900 पेक्षा जास्त गुण मिळवणारा इंग्लंडचा एकूण सातवाच खेळाडू ठरला आहे.

त्याचबरोबर 38 वर्षांनंतर तो 900 पेक्षा जास्त गुण मिळवणारा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी 1980 मध्ये इयान बॉथम यांनी 900 गुणांचा टप्पा पार केला होता.

तसेच अँडरसन सार्वकालीन कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये 19 व्या स्थानी आला आहे.

अँडरसनने लॉर्ड्स कसोटीत पहिल्या डावात 20 धावा देत 5 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 23 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. याबरोबरच त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर 100 विकेट्सही पूर्ण केल्या.

तसेच तो इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाराही गोलंदाज असुन त्याने आत्तापर्यंत 140 कसोटी सामन्यात 26.83 च्या सरासरीने 553 विकेट्स घेतल्या आहेत.

आयसीसीने सोमवारी जाहिर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडच्या अन्य खेळाडूंमध्ये लॉर्ड्स कसोटीत शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सनेही चांगली प्रगती केली आहे.

त्याने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. तो या क्रमवारीत 7 व्या स्थानावर आला आहे.

तसेच फलंदाजी क्रमवारीत त्याने वयक्तिक सर्वोत्तम 50 वे स्थान मिळवताना 34 स्थानांची प्रगती केली आहे.त्याचबरोबर गोलंदाजी क्रमवारीत 35 व्या स्थानावरुन 32 व्या स्थानी झेप घेतली आहे.

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोनेही पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता 9 व्या स्थानी आला आहे. त्याने लॉर्ड्स कसोटीत वोक्सला साथ देताना 93 धावांची खेळी केली होती. 

कसोटी क्रमवारीत 900 पेक्षा जास्त गुण मिळवणारे इंग्लंडचे गोलंदाज-

932 गुण – सिडनी बार्न्स

931 गुण – जॉर्ज लोहमन

912 गुण – टॉनी लॉक

911 गुण – इयान बॉथम

907 गुण – डेरेक अंडरवुड

903 गुण –  अॅलेक बेडसेर

903 गुण – जेम्स अँडरसन

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण

एकही धाव, झेल किंवा विकेट न घेणाऱ्या खेळाडूला मिळाले ११ लाख

अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती