या खेळाडूने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा होता विरोध

लंडन। 2019 विश्वचषकात रविवारी(23 जून) 30 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी पराभव स्विकरावा लागला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे या विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले आहे.

या पराभवामुळे निराश झालेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सामना संपल्यानंतर मोठा खूलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला संघ व्यवस्थापणाने आयपीएलमध्ये भाग घेण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

रबाडाला या विश्वचषकात आत्तापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात फक्त 6 विकेट घेण्यात यश आले आहे. त्यामुळे डुप्लेसिसला सामना संपल्यानंतर रबाडाबद्दल प्रश्न विचारण्यात आला की तो विश्वचषकात थकल्यासारखा आणि कमजोर असल्यासारखा वाटत आहे.

त्यावर डू प्लेसिस म्हणाला, ‘मला माहित नाही की हे बरोबर उत्तर आहे की नाही कारण त्याचे अपयश आम्हाला जास्त टोचत आहे. आम्ही त्याला आयपीएलमध्ये सहभागी होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे तो ताजातवाणा राहिल.’

‘त्यानंतर तो जेव्हा आयपीएल खेळण्यासाठी गेला तेव्हा आम्ही त्याला आयपीएलच्या मध्यातून परत बोलावण्याचा विचार केला होता. कारण हे महत्त्वाचे होते, फक्त त्याच्यासाठीच नाही तर बाकी खेळाडूंसाठीही.’

‘हे सर्व मी आयपीएल सुरु होण्याच्या आधीचे सांगत आहे. तीन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी वेळ शोधणे आणि प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. कारण ते सर्व प्रकारचे क्रिकेट खेळतात आणि मग आयपीएलही.’

‘काही खेळाडूंना विश्रांती करणे गरजेचे होते. ते या स्पर्धेत ताजेतवाणे नव्हते. हे फक्त कारण नाही; हे सत्य आहे. रबाडाबद्दल सांगायचे झाल्यास तूम्ही पाहू शकता त्याचा वेग नेहेमीपेक्षा थोडा कमी होता.’

‘पण प्रत्येकवेळी ही आव्हाने एक संघ म्हणून घ्यायची आहेत. दुर्दैवाने तूम्ही राष्ट्रीय संघात रबाडासारख्या खेळाडूला पुढील दोन मालिकेत विश्रांती घे असे सांगू शकत नाही. तो संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे असे करणे कठीण आहे.’

‘तूम्हाला त्याच्यासारख्या खेळाडूंची गरज असते. तूम्हाला तीन किंवा चार किंवा पाच गोलंदाजांची गरज असते. ज्यामुळे रोटेशन प्रणालीचा अवलंब करता येतो. आमची एन्रिच नॉर्जेसह असे करण्याची योजना देखील होती. तो पर्यायी गोलंदाज होता. पण तोसुद्धा दुखापतग्रस्त झाला.’

‘त्यामुळे आमची वेगवान गोलंदाजी कमजोर झाली आणि संघात एकटा वेगवान गोलंदाज असलेल्या रबाडावर ज्यादाची जबाबदारी आली.’

असे असले तरी डू प्लेसिसने रबाडाला पाठिंबा दिला आहे. डू प्लेसिसने या विश्वचषकातील कामगिरी ही रबाडाच्या कारकिर्दीतील पहिलीच खराब कामगिरी असल्याचे म्हटले आहे. तसेच डू प्लेसिस म्हणाला, त्याच्यासाठी ही चूकांमधून शिकण्याची संधी आहे आणि त्यातून आणखी चांगला गोलंदाज होण्याची संधी आहे.

रबाडाने आत्तापर्यंत या वर्षात 303 षटके गोलंदाजी केली आहे. त्यातील 47 षटके त्याने 2019 च्या आयपीएलमध्ये गोलंदाजी केली आहे. रबाडाने यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 12 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या होत्या.

12 सामने आयपीएलमध्ये खेळल्यानंतर रबाडाला पाठिच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने दक्षिण आफ्रिकेने त्याला मायदेशी बोलावून घेतले होते.

तसेच या विश्वचषकात खेळाडूंच्या अपयशाबरोबरच दक्षिण आफ्रिका सुरुवातीपासूनच खेळाडूंच्या दुखापतींचा सामना करत आहे. त्यांचा अनुभवी गोलंदाज डेल स्टेनही दुखापतीमुळे विश्वचषकातून एकही सामना न खेळता बाहेर पडला.

तर लुंगी एन्गिडी मधल्या काळात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्यालाही काही सामन्यांना मुकावे लागले. त्याचबरोबर या विश्वचषकाच्या आधी रबाडाही दुखापतग्रस्त होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिका हरली पण इम्रान ताहिरने रचला इतिहास

…म्हणून आयसीसीने न्यूझीलंड संघाला सुनावली ही शिक्षा

विंडिज विरुद्ध विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाही, हे आहे कारण