नाशिक सायकलीस्टची त्रिपुरारी पोर्णिमा राईड उत्साहात

बेघर नागरिकांना केले ब्लँकेट्सचे वाटप

नाशिक । त्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्ताने नाशिक सायकलीस्टतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे सायकलिंगचा संदेश देणारी भव्य रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीच्या भोवती असलेले दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर नाईट राईडचे आयोजन करण्यात आले होते.

गोल्फ क्लब ग्राउंड -मायको सर्कल -तिडके कॉलनी – मुंबई नाका -द्वारका -सारडा सर्कल -बडी दर्गा -गंगाघाट -कार्तिक स्वामी मंदीर असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीतुन सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला.

नाशिक सायकलीस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून 2 वर्षांपूर्वी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. जसपाल पाजी यांच्या आठवणीना उजाळा देण्याचा प्रयत्न करत लायन्स क्लबचे ऑफ नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, नाशिक सायकलिस्ट अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांच्या उपस्थितीत बेघर नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कोल्हापुर येथील ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सायकलीस्टचा सत्कार करण्यात आला. अनिकेत झवर यास डेक्कन क्लिफ हँगरसाठी शुभेच्छा दिल्या.

या राईड मध्ये लहान, मोठे अनेक सायकलीस्ट सहभागी झाले होते. यावेळी शेवटी सर्व सायकलिस्टने बडी दर्गा व कार्तिक स्वामी मंदीर येथे भेट दिली. रॅलीचे नियोजन डॉ. मनीषा रौंदळ यांच्याकडे होते.