वीरेंद्र सेहवागचा पाकिस्तानी ट्विपलवर हल्लाबोल! कुलभूषण जाधव यांच्यावर ट्विट केल्याने घेतला समाचार…

भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा तेवढीच स्फोटक फलंदाजी ट्विटरवरूनही करतो. परंतु जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा वीरू अजिबात मागे रहात नाही.

काल कुलभूषण जाधव प्रकरणावरून एका पाकिस्तानी ट्विपलने वीरेंद्र सेहवागला एक ट्विट केला. त्यात तो पाकिस्तानी ट्विपल म्हणतो, ” तुम्हा लोकांना कमी डोकं आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय काहीही होवो आम्ही फाशी देणाराच आहोत. ”

यावर सेहवागने जोरदार उत्तर देताना म्हटले आहे, ” स्वप्नात होईल, जसे तुम्ही लोक भारताला विश्वचषकात हरवण्याची स्वप्ने पाहता. एकवेळा कुत्रा पाळ, मांजर पाळ, पण गैरसमज पाळू नकोस.”

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काल स्थगिती दिली. त्यानंतर असंख्य भारतीयांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. त्यात भारताचा हा माजी फलंदाजही मागे नव्हता.