नो बॉलसाठी जसप्रीत बुमराहला असे केले जात आहे ट्रोल !

धरमशाला। येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने उपुल थरंगाला बाद करताना नो बॉल टाकला होता, त्यामुळे थरंगाला जीवदान मिळाले होते.

या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलत कालच्या सामन्यात श्रीलंकेकडून थरंगाने सर्वोच्च धावा केल्या. त्याने ४९ धावांची खेळी केली. त्याला सामन्याच्या सहाव्या षटकातच बुमराहने दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पडले होते, परंतु बुमराहचा हा चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे दिसून आले.

श्रीलंकेचे प्रशिक्षक निक पॅथॉस यांनी सुद्धा नाणेफेक आणि बुमराहने थरंगाला टाकलेला नो बॉल हे सामन्यातले महत्वाचे क्षण असल्याचे म्हटले आहे.

याआधीही बुमराहने यावर्षी जून महिन्यात पार पडलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध फखर झमानला सुद्धा नो बॉल टाकून बाद केले होते. परंतु झमानने या नो बॉलमुळे मिळालेल्या जीवदानाला फायदा घेत ११४ धावांची शतकी खेळी केली होती. ही खेळी पाकिस्तानच्या विजयात महत्वाची ठरली होती.

यामुळे महत्वाच्या सामन्यात बुमराहकडून टाकल्या गेलेल्या नो बॉलला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.