यु मुंबाने अतिटतीचा सामना आपल्या नावे करत मोसमातला पहिला विजय मिळवला

प्रो कबड्डीमध्ये आज तिसऱ्या दिवशी यु मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघात सामना पार पडला. यु मुंबा मागील सामन्यात रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही पातळ्यांवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता त्यामुळे हा सामना जिंकून ५व्या मोसमात विजयी मार्गावर परतायचे होते. तर हरियाणा संघ प्रो कबड्डीमधील आपला पहिला सामना खेळत होते आणि मोसमाची सुरुवात विजयाने करण्याच्या हेतूने ते देखील मैदानात उतरले होते.

सामन्याला सुरुवात झाली, दोन्ही संघ संयमी खेळ खेळत होते. पहिला हाफ संपत आला तरी दोन्ही संघाच्या गुणांमध्ये जास्त फरक नव्हता. पण दुसरा हाफ सुरु झाला आणि दोन्ही संघ आक्रमक खेळ करू लागले. यु मुंबासाठी अनुपने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली तर हरयाणाकडून वझीर रेडींगमध्ये गुण मिळवत होता. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघ आक्रमक झाले. पण सामना संपण्यासाठी ६ मिनिटे शिल्लक असताना काशीलिंगने कमाल केली आणि रेडींगमध्ये दोन गुण मिळवले.

मुंबाचा संघ सामन्यावर आपली पकड मजबूत करेल असे वाटत असताना डिफेन्समध्ये यु मुंबा संघाने चुका केल्या आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांची बढत कमी होत गेली. २९व्या मिनिटाला रेडींगसाठी हरयाणाचा खेळाडू वझीर सिंग आला आणि त्याने बोनस टाकला पण त्याला बाद करण्यासाठी मुंबाचा डिफेन्स खेळाडू पुढे आला आणि तो वझीरला बाद करू शकला नाही आणि वाझीरने त्या रेड मधून २ गुणांची कमायी केली. सामना २८-२९ अश्या गुणांवर येऊन ठेपला. सामन्यातील शेवटची रेड अनुपने केली. त्यात जर अनुपला हरयाणा स्टिलर्स संघाने बाद केले असते तर सामना २९-२९ गुणांवर येऊन बरोबरीत सुटला असता. पण तसे करण्यात स्टीलर्स संघाला अपयश आले आणि यु मुंबाने सामना २९-२८ असा एका गुणाच्या फरकाने जिंकला.

हरयाणासाठी त्यांचा कर्णधार असलेल्या सुरिंदर नाडाने डिफेन्समध्ये चांगली कामगिरी केली. या मोसमातील पहिल्याच सामन्यात हाय ५ करण्यात यश आले तर त्याला मोहित चिल्लरने उत्तम साथ दिली. त्यांनी आपल्या भूतपूर्व संघाविरुद्ध चांगला खेळ केला. हे दोन्ही खेळाडू प्रो कबड्डीच्या पहिल्या तिन्ही मोसमात यु मुंबा संघाकडून खेळले होते.

हरियाणा संघ देखील मैदानात चांगलाच उतरला आहे हे सामन्याच्या निकालावरून दिसते आहे तर यु मुंबाला विजयी सूर गवसला का हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल.