प्रो कबड्डी: यु मुबा- यु.पी योद्धा सामन्यात पहायला मिळणार रेडींगचा थरार ?

प्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना यु मुंबा आणि यु.पी.योद्धा या दोन संघात होणार आहे. या मोसमात यु मुंबाने चार सामने खेळले आहेत. त्यातील दोन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे तर दोन सामने त्याची गमावले आहेत. यु.पी.योद्धाने ५ सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामने जिंकला आहे तर एक सामना या संघाने गमावला शिवाय एक सामना या संघाने बरोबरीत सोडवला आहे.

यु.पी.योद्धा सध्या चांगल्या लयीत आहे. या संघाने जे सामने खेळले आहेत त्यात त्यांनी विरोधी संघाला आरामात हरवले आहे. जो एक सामना हा संघ बेंगाल वॉरियर्स विरुद्ध गमावला होता. त्यात यु.पी.चा स्टार रेडर रिशांक देवाडीगा या सामन्यात खेळला नव्हता. याचा फटका या संघाला बसला होता. त्यानंतर संघ विजयी मार्गावर परतला. शेवटचा सामना पटणा विरुद्ध हा संघ खेळला होता. हा सामना यु.पी. जिंकण्याच्या स्थितीत होते परंतु प्रदीप नरवालने शेवटच्या काही मिनिटात उत्तम खेळ करत हा सामना बरोबरीत सोडवला.

या संघाकडून कर्णधार नितीन तोमर, रिशांक देवाडीगा उत्तम कामगिरी करत आहेत. या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू राकेश कुमारचा खराब फॉर्म हा या संघासाठी चिंतेची बाब आहे.

यु मुंबा संघ या मोसमातील सर्वात जरी आक्रमक संघ असला तरी या संघाचे रेडर म्हणावी तशी कामगिरी करू शकले नाहीत. याचा फटका संघाला बसला आहे. यु मुंबाने खेळल्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव पहिला आहे. डिफेन्स या संघाची या मोसमातील चिंतेची बाब आहे.

यु मुंबाला हा सामना जिंकायचा असेल तर काशीलिंग आडके, शब्बीर बापू यांना या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. अनुप कुमारला देखील स्वतःचा खेळ थोड़ा उंचवावा लागेल.

दोन्ही संघ या सामन्यात आक्रमक खेळ करतील असा अंदाज आहे. त्यामुळे या सामन्यात रेडींगमधील थरार अनुभवायला मिळण्याची जास्त शक्यता आहे. ज्या संघाचा डिफेन्स चांगला खेळेल तो संघ हा सामना जिंकेल.