आज गुजरात विरुद्ध मुंबई आमने-सामने

प्रो कबड्डीमध्ये आज ‘झोन ए’ मधील सामन्यात यु मुंबा आणि गुजरात फॉरचून जायन्टस आपसात भिडणार आहेत. या दोन्ही संघात झालेल्या सामन्यात गुजरातने यु मुंबाला पराभूत केले होते.

गुजरात संघाला घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात जी विजयाची लय गवसली आहे ती या संघाने कायम ठेवली आहे. या संघाचे रेडर सचिन, सुकेश हेगडे हे उत्तम कामगिरी करत आहेत. या दोन संघात झालेल्या मागील सामन्यात रोहित गुलियाने यु मुंबाच्या डिफेन्सचे कंबरडे मोडले होते. या संघाची ताकद यांचे डिफेंडर आहेत. गुजरातसाठी खेळणारे दोन्ही इराणी डिफेंडर्स सध्या कारकिर्दीतील उत्तम लयीत आहेत. लेफ्ट कॉर्नर फझल अत्राचलीने मागील पुणेरी पलटण विरुद्धच्या सामन्यात खूप उजवा खेळ करत डिफेन्समध्ये नऊ गुण मिळवले होते. राइट कॉर्नर अबोजार मिघानी या मोसमात दुसरा सर्वात यशस्वी डिफेंडर आहे. खेळाच्या सर्व पातळ्यांवर हा संघ मजबूत आहे.

यु मुंबासाठी घरेलू मैदानावर होणारे सामने त्यांना अपेक्षित निकाल देऊ शकले नाहीत. यु मुंबाने सलग चार सामने गमावले आहेत त्यातील तीन सामने या संघाने घरच्या मैदानावर गमावले आहेत. मागील दबंग दिल्ली विरुद्धच्या सामन्यात या संघाच्या रेडर्सने उत्तम कामगिरी केली. या सामन्यात यु मुंबाच्या डिफेन्सला चांगली कामगिरी करता अली नाही. त्यामुळे हा सामना ३३-३२ असा एका गुणाच्या फरकाने गमवावा लागला. मागील काही सामन्यात यु मुंबाच्या रेडर्सने उत्तम कामगिरी केली आहे. श्रीकांत जाधव याने मागील काही सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने करत रेडींगमध्ये भरीव कामगिरी केली आहे. काशीलिंग आडके आणि अनुप कुमार यांना रेडींगमध्ये लय गवसली आहे.

यु मुंबाने घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात शेवटच्या काही मिनिटात हार पत्करली आहे. हा संघ मागील सर्व मोसमात शेवटच्या क्षणी सामना विरोधी संघाकडून खेचून आणायचा. परंतु या मोसमात विशेषतः घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात या संघाला आघाडी टिकवून ठेवता आलेली नाही.याचा फटका संघाला बसला असून हा संघ सामने गमावत आहेत.

या सामन्यात विजयाची जास्त संधी गुजरातला आहे. गुजरात रेडींगमध्ये थोडा कमकुवत भासत असला तरी डिफेन्स या संघाची ताकद आहे. कागदावर सर्वात यशस्वी दिसणारे यु मुंबाचे रेडर्स या सामन्यात कशी कामगिरी करतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.

PC: www.prokabaddi.com