पृथ्वीने चांगलं खेळत रहावं, घराची चिंता करू नये – उद्धव ठाकरे

आयसीसी अंडर १९ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याचा काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांच्या मातोश्री या निवास्थानी यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी पृथ्वी शॉला घर मिळण्याची ग्वाही देत उद्धव ठाकरे म्हणाले, “पृथ्वी शॉने त्याचा खेळावरती लक्ष केंद्रीत करावं. घराची चिंता करू नये. आम्ही त्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही.”

” पृथ्वीच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत” असेही शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले.

शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पृथ्वी शॉला मुंबईत घर देण्याची मागणी केली आहे.
पृथ्वी शव पूर्वी मुंबईपासून दूर असलेल्या विरारमध्ये राहत असे परंतु आमदार पोतनीसांनी त्याची व्यवस्था एसआरए कॉलनी वाकोला, सांताक्रूझ येथे केली.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पृथ्वी शॉ आणि अंडर १९ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्बरे
यांचा राजभवन येथे सत्कार केला. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, भाजप आमदार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील या वेळी उपस्थित होते.