दुसऱ्या सराव सामन्यातही भारताचा दणदणीत विजय! बांगलादेशचा २४० धावांनी केला पराभव

कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यातही दणदणीत विजय मिळवीत आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रबळ दावेदारांपैकी एक का आहोत याच कारण दिल. भारताने ओव्हलच्या मैदानावर झालेल्या सराव सामन्यात बांगलादेशवर २४० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३२४ धावा केल्या. त्यात शिखर धवन ६०, दिनेश कार्तिक ९४ आणि हार्दिक पंड्या नाबाद ८० यांनी सुरेख अर्धशतकी खेळी केल्या.

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवनच्या साथीला आलेल्या अजिंक्य रहाणेलाही काही विशेष चमक दाखवता आली नाही. तोही ११ धावांवर बाद झाला.

परंतु त्यानंतर आलेल्या दिनेश षटकार चौकारांची आतिषबाजी करत आपली निवड का केली हेच दाखवून दिले. त्याला ६० धावा करून शिखर धवनने मोलाची साथ दिली. शिखर धवननंतर फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राच्या केदार जाधवने चांगली सुरुवात केली असताना त्याला त्याचे मोठ्या खेळीत काही रूपांतर करता आले नाही. तो ३१ धावांवर बाद झाला.

त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने आपला आयपीएलमधील फॉर्म इथेही कायम ठेवत धडाकेबाज ८० धावांची खेळी खेळली. त्यात त्याने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार खेचले.

आज भारताच्या युवराज सिंग, एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनी नवख्या खेळाडूंना फलंदाजीला बढती दिल्यामुळे त्यांच्यापर्यंत फलंदाजी काही येऊ शकली नाही.

भारताच्या ३२४ धावांना प्रतित्तोर देताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. उमेश यादवच्या तिसऱ्याच षटकात सलामीवीर सौम्या सरकार (२ धावांवर ) तर शब्बीर रहमान भोपळाही न फोडता तंबूत परतले. पुढच्याच षटकात इमारुल काईलला भुवनेश्वर कुमारने यादव करवी झेलबाद केले. त्यानंतर नियमित अंतराने बांग्लादेशच्या विकेट पडत गेल्या. सुंझामुल इस्लाम, मेहंदी हसन मिराज आणि मुशफिकूर रहीम या फलंदाजांना फक्त  दोन अंकी धावसंख्या उभारता आली. उमेश यादवच्या ५  षटकात ३  विकेट आणि भुवनेश्वर कुमारच्या ५  षटकात ३  विके  विकेट्सच्या जोरावर बांगलादेशचा डाव २३.५ षटकात ८४ धावांवर आटोपला आणि भारताला २४०  धावांनी दुसऱ्या सामन्यात विजय मिळाला.

भारताचा मुख्य स्पर्धेतील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ४ जून रोजी बर्मिंहम येथे आहे.