कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी

पर्थ। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका म्हटले की वाद हे काही चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाही. त्यामुळे सध्या या दोन संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये होत असलेले स्लेजिंग पहायला मिळत आहे.

या मालिकेतील पर्थ येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांमधेच शाब्दिक चकमक पहायला मिळाली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन या दोघांमध्ये ही चकमक घडली होती. पण ही गोष्ट तिथेच न थांबता चौथ्या दिवशीही या दोघांकडून त्याचे पडसाद पहायला मिळाले आहेत

या सामन्यात आज चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम पेन आणि उस्मान ख्वाजा आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत होते. त्यावेळी तिसऱ्या दिवसाप्रमाणे कोहली आणि पेनमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक पहायला मिळाली आहे. पण यावेळी मैदानावरील पंच ख्रिस गॅफेनी आणि कुमार धर्मसेना यांनी मध्यस्थी केली आहे.

झाले असे की आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 71 वे षटक जसप्रीत बुमराह टाकत असताना पेन आणि कोहलीमध्ये हे संवाद सुरु झाले. पेन कोहलीला म्हणाला, ‘काल तू हरवला होतास, आज शांत रहायचा प्रयत्न कर.’ पण त्याचवेळी गॅफेनी यांनी त्यांना मधेच आडवत ‘आता हे बसं झाले’ असे बजावले.

परंतू यावर पेन म्हणाला, ‘आम्हाला बोलण्याची परवानगी आहे.’ त्यानंतर पुन्हा गॅफेनी यांनी समजावयचा प्रयत्न करताना ते म्हणाले, ‘खेळ खेळा. तूम्ही कर्णधार आहात. टीम तू संघाचा कर्णधार आहेस.’ मात्र यानंतरही पेन कोहलीला म्हणाला, ‘विराट, शांत रहा.’ त्याच्या या वाक्यावर विराट फक्त हसला.

यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा कोहली आणि पेन एकमेकांसमोर आले होते. जेव्हा पेन एक धाव घेण्यासाठी धावत होता तेव्हा कोहली त्याच्या समोर आला. त्यावेळी ते एकमेकांच्या समोर अगदी जवळ उभे होते. यामुळे पेनने कोहलीची तक्रार पंचाकडे केली. तसेच कोहलीही स्केअर लेगला उभे असणारे पंच कुमार धर्मसेना यांच्याबरोबर चर्चा करताना दिसून आला.

या दोघांमध्ये तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात ही शाब्दिक चकमक पहिल्यांदा पहायला मिळाली होती. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात 123 धावांची शतकी खेळी केली आहे. पण तो विवादात्मक झेलमुळे बाद झाला.

त्यामुळे नाराज झालेला विराट आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सतत काहीतरी बोलत होता. तिसऱ्या दिवशी शेवटच्या षटकात भारतीय संघाने जेव्हा पेनचा मागे झेल गेल्याचे अपील केले तेव्हा विराट म्हणाला ‘जर त्याने गोंधळ घातला तर मालिका 2-0 अशी होईल.’ विराटचे हे वाक्य स्टंप माइकमधून सर्वांना ऐकू आले.

त्याच्या या वाक्यावर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार पेननेही माघार न घेता विराटला प्रतिउत्तर दिले, ‘त्यासाठी तूम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायला पाहिजे.’

या सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 112 धावा केल्या असून विजयासाठी भारताला अजून 175 धावांची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेली धावसंख्या टॉम लेथमने केली

एकीकडे टीम इंडिया धावांसाठी झगडत असताना हार्दिक पंड्या रणजी ट्राॅफीत धडका सुरुच

कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मोहम्मद शमी ठरला केवळ ५ वा भारतीय वेगवान गोलंदाज