युरो चॅम्पिअनशिप: आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने

आज जॉर्जिया येथे होत असलेल्या युरो चॅम्पिअनशिप अंडर १९च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने येतील.  दोन्ही संघानी आपले सेमी फायनलचे सामने १-० च्या फरकाने जिंकले. पोर्तुगालने नेदरलँडचा पराभव केला आहे तर इंग्लंडने चेक प्रजासत्ताकचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

दोन्ही संघानी या स्पर्धेच्या इतिहासात प्रत्येकी दोनवेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पण विजेतेपदाने दोन्ही संघाना हुलकावणी दिली आहे. पोर्तुगाल
संघ २००३ मध्ये इटलीकडून तर २०१४ साली जर्मनीकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला होता तर इंग्लंडचा संघ २००५मध्ये फ्रान्सकडून तर २०१३साली युक्रेनकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला होता.

इंग्लंडच्या फुटबॉल संघाची या वर्षीची कामगिरी खूप चांगली राहिली असून ते मे महिन्यात झालेल्या अंडर १७च्या युरो चॅम्पिअन्सशिपच्या अंतिम फेरीत पोहचले होते तर अंडर २१च्या संघाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. तर आज ते अंडर १९चा अंतिम सामना खेळणार आहेत.

पोर्तुगालच्या संघात मागच्यावर्षीही असलेला प्रतिभावान खेळाडू दियागो कोस्टा असणार आहे तर इंग्लंडच्या संघात मागील वर्षी असणारा एकही खेळाडू नाही. कोस्टाच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा पोर्तुगालला नक्की होईल असे वाटते. इंग्लंडने मागील चारही सामने जिंकले आहेत तर पोर्तुगालने तीन सामने जिंकले तर एक सामना बरोबरीत सोडवला आहे.

पोर्तुगाल संघात दियागो कोस्टा असला तरी इंग्लंडचा संघ खूप तंत्रशुद्ध खेळ करत असून स्पर्धेत सर्वाधीक गोल आणि क्रॉसेस इंग्लड संघाने केले आहेत. पोर्तुगाल संघाप्रमाणेच इंग्लंड संघाला विजेतेपदाची संधी असणार आहे.

आज इंग्लंड आणि पोर्तुगाल संघातील जो संघ जिंकेल तो प्रथमच  युरो चॅम्पिअनशिप अंडर १९चे विजेतेपद जिंकणार आहे.