राहुल द्रविडचा सल्ला ऐकला आणि त्याने ठोकली दोन शतके

१९ वर्षांखालील भारतीय संघाचा सलामीवीर शुभम गिलने राहुल द्रविडने दिलेल्या आव्हानामुळे फलंदाजीत फायदा झाल्याचे सांगितले आहे. द्रविडने त्याला हुशारीने आणि शांतपणे फलंदाजीच्या शैलीत बदल करायला लावला होता.

याविषयी आयसीसीशी बोलताना शुभम म्हणाला, “जेव्हा गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंड(१९ वर्षांखालील संघ)ने भारताचा दौरा केला होता तेव्हा मी माझ्या पहिल्या दोन वनडे सामन्यात २ खराब फटाके मारले होते. मी चेंडूला हवेत मारण्याच्या प्रयत्नात बाद झालो होतो.”

त्याच्या या कामगिरीवर द्रविडने त्याला हवेत फटका न मारण्याचा सल्ला दिला. याविषयी शुभम म्हणाला, ” द्रविड माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला सांगितले की ‘तू चांगला स्ट्रायकर आहेस मग तरी तुला चेंडू हवेत का मारायचा असतो.?”

पुढे शुभम म्हणाला, “त्यामुळे त्यांनी मला पुढील दोन सामन्यात हवाई फटके मारून एकही धाव न करण्याचे आव्हान दिले आणि मी पुढील दोन्ही सामन्यात शतके केली. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘बघ, तू मैदानी फटके मारूनही धावा करू शकतो, मग तुला हवेत फटके मारण्याची गरज काय?”

द्रविड सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळत आहे. त्यामुळे तो उद्यापासून सुरु होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाबरोबर न्यूझीलंड मध्ये आहे.

शुभमने १६ वर्षांखालील पंजाब इंटर डिस्ट्रिक स्पर्धेत वयाच्या १४ व्या वर्षी २७७ चेंडूत ३५१ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर त्याने ५८७ धावांची सलामी भागीदारी करण्याचा जागतिक विक्रमही केला होता. तसेच त्याने नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफीत दोन सामन्यात खेळताना १ शतकही झळकावले आहे.

शुभमने आयसीसीशी बोलताना क्रिकेट खेळण्यासाठी त्याला मिळालेल्या प्रेरणेविषयी सांगितले, ” मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्याचे एकमेव कारण म्हणजे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण. मला या तिघांना खेळताना बघायला आवडायचे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्यांच्या सारखे खेळण्याचा प्रयत्न करायचो. मी भिंतीवर चेंडू टाकून ते ज्या प्रकारे ड्राईव्ह मारतात तसा ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न करायचो.”