जबडा तुटला, तरीही तो लढला आणि केले शतक!

जबडा तुटला असताना उन्मुक्त चंदने केली शतकी खेळी, कुंबळेची झाली आठवण

दिल्ली विरुद्ध उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात उन्मुक्त चंदने जबडा तुटला असतानाही शतकी खेळी केली. त्याच्या याच शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने उत्तरप्रदेशला ५५ धावांनी नमवले.

सलामीला आणलेल्या चंदने १२५ चेंडूत ११६ धावांची खेळी करताना १२ चौकार आणि ३ षटकार खेचले. त्याच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीने ५० षटकांत ६ विकेट्स गमावून ३०७ धावांची खेळी केली.

उन्मुक्त चंदला रणजी ट्रॉफी स्पर्धेत खराब फॉर्ममुळे रणजी ट्रॉफीच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागले होते. परंतु सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्धशतकी खेळी करून त्याने आपण पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले होते.

चंदच्या या खेळीमुळे अनिल कुंबळेच्या त्या खेळीची आठवण मात्र क्रिकेटप्रेमींना झाली. २००२मध्ये जेव्हा भारत विरुद्ध विंडीज यांच्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळेचा जबडा तुटला होता तेव्हाही त्याने गोलंदाजी करत विंडीजचा दिग्गज ब्रायन लाराची विकेट घेतली होती.

सामना सुरु होण्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना तो जखमी झाला. त्यानंतर काही वेळातच सामना सुरु झाला. परंतु चंदने सामना खेळायला प्राधान्य देताना संघहित काय असते हे दाखवून दिले.

यापूर्वी ग्रॅमी स्मिथसुद्धा संघहितासाठी आपला मोडलेला हात घेऊन मैदानात उतरला होता. जगातील कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून स्मिथला का ओळखले जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सध्या उन्मुक्त चंद हे नाव अनेक अर्थांनी चर्चेत आहे. त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेता कर्णधार. सध्या हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला आहे. आजपर्यंत या विजेत्या संघातील कर्णधाराला भारतीय संघात संधी मिळाली आहे. मोहम्मद कैफ किंवा विराट कोहली यांनी त्या संधीचे सोने केले. परंतु चंदला आपल्या ह्या कामगिरीचे पुढे सोने करता आले नाही आणि त्याला आजपर्यंत भारतीय संघाकडून एकही सामना खेळता आलेला नाही.

जेव्हाही १९ वर्षाखालील क्रिकेटपटूंचा विषय निघतो तेव्हा ह्या खेळाडूचे नाव सर्वात प्रथम समोर येते. सध्या चंदचे वय २५ असून त्यापुढे मोठी कारकीर्द आहे. योग्य कामगिरी केली तर येत्या काही काळात तो भारताकडून खेळताना दिसू शकतो.