साखळीतील दुसऱ्या पराभवामुळे उत्तर प्रदेशचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न भंगणार

पुरुषांच्या अ गटात हरियाणाने उत्तर प्रदेशाला ३७-२३असे पराभूत करीत ३ऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत आगेकूच केली. जोगेश्वरी येथील एस आर पी मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्वार्धात चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरियाणाने १६- १२असे वर्चस्व राखले होते. या सामन्यात हरियाणाचा बचाव भक्कम होता. त्यांनी या सामन्यात ५अव्वल पकड करीत १० गुण, ९पकडीचे ९गुण, तर दोन वेळा चढाई करणारा स्वयंचित ( सेल्फ आऊट )झाल्यामुळे २ गुण असे एकूण २१गुण मिळविले.

यात रविंदर पहेलच्या ५ पकडी होत्या. त्यातील ३ सुपर कॅच होत्या. युपीकडून अभिषेक सिंग, अविनाश कुमार यांचा आज प्रभाव पडला नाही. या पराभवाने युपीचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्ह आहेत.

पुरुषांच्या ब गटात सेनादलाने रेल्वेचा कडवा प्रतिकार ४१-२९असा परतवून लावला. मध्यांतराला सेनादल १६-१८असे दोन गुणांनी पिछाडीवर होते. सेनादलकडून नितीन तोमरने १८ चढायात ८गुण मिळविले.

मोनू गोयलने १९ चढायात ३ बोनस व ७ गुण असे १० गुण मिळविले. बदली खेळाडू म्हणून संधी मिळवलेल्या गुरुनाथ मोरेने ६ चढायात ५ गुण व २ यशस्वी पकडी केल्या. रेल्वेच्या प्रविणकुमारने १८चढायात २ बोनस व ७ गुण श्रीकांत जाधव १७ चढायात ११ गुण मिळविले.

महिलांच्या ब गटात भारतीय रेल्वेने हरियाणाला ४५-३४ असे नमविले. मध्यांतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात रेल्वेने १७-१५अशी आघाडी राखली होती. रेल्वेच्या पायल चौधरीने १४ चढायात २बोनस व १४ गुण असे १६गुण मिळवीत तर रिकू नेगीने ४पकडी करीत या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली.

हरियाणाकडून साक्षी कुमारीने १२ चढायात ३बोनस व १२ गुण असे एकूण १५गुण मिळविले. २वेळा तिने एकाच चढाईत ३-३ गडी टिपले. प्रियांकाने २सुपर कॅच केल्यामुळे हरियाणावर होणारा लोण लांबला. अ गटात हिमाचलने पंजाबला ३६-२१ असे नमविले. मध्यांतराला २४- ०९अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या हिमाचलने सावध खेळ करीत हा विजय सहज मिळविला.हिमाचलच्या ललिताने ५ यशस्वी पकडी केल्या. तर ज्योतीने ८ चढायात ५ गुण घेत तिला छान साथ दिली. पंजाबच्या रमणीक कौरने ४गुण घेत थोडा फार प्रतिकार केला.

पुरुषांच्या दुसऱ्या ब गटातील सामन्यात कर्नाटकने उत्तराखंडचा ४५-१२असा धुव्वा उडविला. पूर्वार्धात ९.२२ मिनिटाला पहिला, तर १५.२६मिनिटाला दुसरा लोण देत २७-०९अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ताबोडतोब १.०९ मिनिटाला तिसरा व १३.२०व्या मिनिटाला चौथा लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले.

प्रशांत राय याने १३ चढाया करीत ११गुण घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला.त्याला सुकेश हेगडे, शब्बीरबापू यांनी ४-४गुण घेत चढाईत उत्कृष्ट साथ लाभली. तर ३ यशस्वी पकडी करीत जीवाकुमारने देखील आपली भूमिका पार पाडली. उत्तराखंडच्या प्रदीपकुमारची काय आज मात्रा चालली नाही. महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेशने छत्तीसगडला २९-२०असे नमविले. मध्यांतराला १८-०९अशी आघाडी घेणाऱ्या छत्तीसगडने नंतर मात्र सावध खेळ केला.

यावेळी त्यांनी आहे ती आघाडी कमी होणार नाही याची काळजी घेत या विजयाला गवसणी घातली. छत्तीसगडच्या अमीरखाने ११चढायात ६ गुण व रामशीलाने १८ चढायात ६ गुण आणि २ यशस्वी पकडी घेत या विजयात महत्वाचा वाटा उचलला. सरस्वतीने देखील ४ पकडी करीत त्यांना छान साथ दिली. उत्तर प्रदेशच्या के एम गोदनने ८चढायात ५गुण घेत एकाकी लढत दिली.