प्रो कबड्डी: बेंगलूरु बुल्स -युपी योद्धा आजची झुंज महत्त्वाची

प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या तिसऱ्या दिवशी १२६ व्या सामन्यात बेंगलूरु बुल्स आणि युपी योद्धा आमने सामने येणारआहेत. हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बेंगलूरु बुल्स संघासाठी समीकरण खूप सोपे आहे. बुल्सला उर्वरित तिन्ही सामने जिंकायचे आहेत आणि त्यांना फक्त एक जबाबदारी घ्यायची आहे की युपी संघ त्यांच्या उर्वरित दोन्ही सामन्यात एकही गुण मिळवणार नाही. युपी संघाचे उर्वरित दोन्ही सामने बेंगलूरु बुल्स विरुद्धच आहेत.

बेंगलूरु बुल्सला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांचा कर्णधार रोहित कुमार याला सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच सामन्याची सूत्रे हातात घ्यावी लागतील आणि रेडींगमध्ये त्याला कमाल करावी लागेल. या सामन्यात अजय कुमार यांच्याकडून देखील खूप मोठी अपेक्षा असणार आहे. या सामन्यात बुल्सला डिफेन्समध्ये खूप मजबूत कामगिरी करावी लागेल. कारण मागील सामन्यात युपीच्या रिशांकने २८ रेडींग गुण मिळवले होते.  त्याला रोखण्याची जबादारी रविंदर पहलवर असणार आहे.

युपी संघाला प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित कण्यासाठी उर्वरित दोन सामन्यात फक्त गुण हवा आहे. त्यात त्यांचे दोन्ही उर्वरित सामने बेंगलूरु बुल्स विरुद्धच आहेत. मागील सामन्यात रिशांकने विक्रमी कामगिरी करत २८ रेडींग गुण मिळवले होते. या सामन्यात देखील त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. या संघाचा नियमित कर्णधार नितीन तोमर संघात परतेल अशी अशा आहे. त्याला मागील सामन्यात विश्रांती मिळाली होती.

हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा असल्याने या सामन्यात खूप जबरदस्त टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात जर युपीने विजय मिळवला किंवा एक गुण जरी मिळवण्यात त्यांना यश आले तर ते झोन बी मधून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा तिसरा संघ आणि शेवटचा संघ बनेल.