प्रो कबड्डी: युपी योद्धाचे रेडर्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्सचे डिफेंडर असा रंगणार सामना

प्रो कबड्डीमध्ये आज दुसरा सामना होणार आहे यु.पी.योद्धा आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघामध्ये. या मोसमात नवीन सामील झालेल्या संघापैकी हे दोन संघ आहेत. दोन्ही संघाकडे सामन्यांवर प्रभाव टाकणारे खेळाडू आहेत. हे सामने यु.पी.योद्धाच्या घरच्या मैदानावर होत असल्याने या संघाला सुट्टीचा दिवस सोडला तर दररोज सामने खेळायचे आहेत.

हरयाणा संघाचा या स्पर्धेतील प्रवास खूप चांगला आहे. या संघाने या मोसमात आजपर्यंत चार सामने खेळले आहेत. पहिला सामना यु मुंबा विरुद्ध गमावल्यानंतर या संघाने एकही सामना गमावलेला नाही. उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने या संघाने बरोबरीत सोडवले आहेत तर एक सामना जिंकला आहे. या संघाची ताकद यांचा डिफेन्स आहे. कर्णधार सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर यांनी जोडी खूप प्रभावी ठरत आहे. सुरिंदरने खेळलेल्या चारही सामन्यात हाय ५ मिळवला आहे. मोहितने देखील मागील सामन्यात हाय ५ मिळवला होता. रेडींगमध्ये विकास कंडोला आणि वजीर सिंग चांगली कामगिरी करत आहेत.

एकूणच हा हरयाणा संघ सध्या समतोल आहे. कोणत्याही विरोधी संघाला हरवण्याची या संघाकडे क्षमता आहे. डिफेन्स या संघाची जमेची बाजू आहे. रेडींगमध्ये जरी हरयाणाचे रेडर गुण मिळवत असले तरी ते सामना जिंकून देण्यात अपयशी ठरत आहेत. सामना बरोबरीत सोडवण्यापेक्षा एक जास्तीचा गुण मिळवण्याचे ध्येय ठेऊन हे आज मैदानात उतरतील.
यु.पी. योद्धा संघ घरच्या मैदानावर खळतो याचा या संघाला नक्कीच फायदा होणार आहे. या संघातील रेडर्स चांगल्या लयीत आहेत. रिशांक देवाडीगाने मागील सामन्यात यु.मुंबा विरुद्ध रेडींगमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आजच्या सामन्यात त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा असणार आहे. मागील सामन्यात या संघाकडून मोक्याच्या वेळी चुका झाल्या होत्या. त्यामुळे हा संघ मागील सामना हरला. राजेश नरवाल या अनुभवी खेळाडूला संघ एकजूट करून स्वतःचा खेळ उंचावण्याचे आव्हान असणार आहे.

डिफेन्स या संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे या आघाडीवर या संघाला खेळ उंचावावा लागेल. जीवा कुमार आणि राजेश नरवाल या खेळाडूंवर ही जबाबदारी असेल.

आजचा सामना यु.पु.योद्धाचे रेडर्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्सचे डिफेंडर असा रंगणार आहे. दोन्ही संघात प्रत्येक गुणांसाठी आज खूप झुंज दिसणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाला विजयाची समान संधी असली तरी विजयाचे झुकते माप यु.पी.कडे आहे.