या संघाकडे आहे ‘प्ले ऑफ’ मध्ये पोहचण्याची क्षमता ..!!

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाचा पहिला पंधरवडा संपला आहे. या मोसमामध्ये चार नवीन संघ दाखल झाले होते. यापैकी आपण आज यु.पी योद्धा संघाची या स्पर्धेतील कामगिरी पाहू.

या संघाने प्रो कबड्डीमध्ये खेळलेल्या ५ सामन्यात ३ विजय मिळवले आहेत. एक सामना या संघाने गमावला आहे. एक सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश आले आहे. यु.पी.संघाचा प्रो कबड्डीमधील पहिला सामना झाला तो तेलुगू टायटन्स यांच्या विरुद्ध. हा सामना यु.पी.ने ३१-१८ असा जिंकला. या सामन्यात यु.पीच्या खेळाडूंनी उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. नितीन तोमर, रिशांक देवाडीगा, महेश गौड यांनी रेडींगमध्ये चांगली कामगिरी केली. राजेश नरवाल, जीवा कुमार आणि नितेश कुमार यांनी डिफेन्समध्ये चांगली कामगिरी केली. नितेश कुमार या नवख्या खेळाडूने या सामन्यात हाय ५ मिळवला होता.

यु.पी.चा दुसरा सामना झाला होता बेंगलुरु बुल्स विरुद्ध. प्रो कबड्डीमधील सर्वात महागड्या दोन खेळाडूंची लढत म्हणून या सामन्याकडे पहिले गेले. यु.पी.चा कर्णधार नितीन तोमर तर बुल्सचा कर्णधार रोहित चौधरी. वयक्तीक कामगिरीत रोहितने ११ गुण मिळवत बाजी मारली. नितीनने ९ गुण मिळवत संघाला ३२-२७ असा विजय मिळवून दिला. या सामन्यात यु.पी.ने डिफेन्समध्ये सांघिक कामगिरी केली. तर रेडींगमध्ये नितीनला रिशांकने ५ गुण मिळवत उत्तम साथ दिली.

यु.पी.चा तिसरा सामना झाला बेंगाल वॉरियर्स संघासोबत. या सामन्यात यु.पी.ला खूप मोठा पराभव सहन करावा लागला. या सामन्यात यु.पी.चा महत्वाचा खेळाडू रिशांक देवाडीगा खेळला नव्हता. कर्णधार नितीन तोमरला बंगालच्या खेळाडूंनी गुण मिळवू दिला नाही. पूर्ण सामन्यात नितीन तोमर याने निराशा केली. या सामन्यात नितीन केवळ १ गुण मिळवू शकला होता. हा सामना यु.पी. ने २०-४० असा गमावला.

यु.पी.योद्धाचा चौथा सामना झाला परत तेलुगू टायटन्स विरुद्ध. हा सामना जिंकत यु.पी.योद्धा संघ परत विजयी लयीत आला. या सामन्यात नितीन तोमर याने रेडींगमध्ये उत्तम कामगिरीकरत १० गुण मिळवले. या सामन्यात रिशांक देवाडीगा संघासोबत परत आला होता याचा संघाला फायदा झाला. रिशांकने या सामन्यात ६ रेडींग गुण मिळवले होते.  त्याने एकही बोनस गुण मिळवला नव्हता. पूर्ण गुण त्याने विरोधी खेळाडूला बाद करत मिळवले होते. या सामन्यात राजेश नरवालने उत्तम कामगिरी करत ५ गुण मिळवले होते.

यु.पी.चा पाचवा सामना झाला होता पटणा पायरेट्स यांच्या विरुद्ध. पटणा या सामान्यांपर्यंत अपराजित संघ होता. यु.पी.चा संघ देखील उत्तम लयीत असल्याने सामना खूप रोमहर्षक होणार याची सर्वांना कल्पना होती आणि झाले ही तसेच हा सामना २७-२७ असा बरोबरीत सुटला. पटणा संघ हा सामना हरला नसल्याने या मोसमातील एकमेव अपराजित संघ म्हणून कायम राहिला. यु.पी.ला सामना जिंकण्याची खूप संधी होती. शेवटच्या काही मिनिटात प्रदीप नरवालने केलेल्या उत्तम खेळाच्या जोरावर हा सामना बरोबरीत सुटला.

या सामन्यात नितीन तोमरने ८, महेश गौडने ६ तर रिशांकने ४ रेडींगमध्ये गुण  मिळवले. या सामन्यात यु.पी. डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही. राजेश नरवाल आणि नितेश कुमार यांनी प्रत्येकी १-१ गुण मिळवला. जीवा कुमारने डिफेन्समध्ये २ गुण  मिळवले होते.

पाच सामन्यांच्यानंतर यु.पी.संघ १८ गुणांसह ‘झोन बी’ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.  नितीन तोमर, राजेश नरवाल आणि रिशांक देवाडीगा यांनी त्यांना मोजलेली किंमत सार्थ करून दाखवली आहे. या सामन्यानंतर हा संघ खूप संतुलीत दिसतो आहे. या संघाकडे प्ले ऑफ मध्ये पोहचण्याची नक्कीच क्षमता आहे असे या संघाने दाखवले आहे.