आणि पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मानव थांबला !

पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान धावपटू१०० मीटर आणि २०० मीटरमध्ये विश्वविक्रम आपल्या नावे असणारा, सलग तीन ऑलिंपिकमध्ये १००,२००आणि १००*४ रिले मध्ये सुवर्ण जिंकून इतिहास घडवणारा उसेन बोल्ट याच्या कारकिर्दीचा शेवट खूप निराशाजनक झाला. आपल्या सुवर्णमयी कारकिर्दीतील अंतीम शर्यत धावताना स्नायूंच्या दुखापतीमुळे तो पूर्ण देखील करू शकला नाही.

लंडन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपनंतर आपण निवृत्त होणार असे बोल्टने जाहीर केले होते. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तो तिसरा आला आणि क्रीडाविश्वाला खूप मोठा धक्का बसला. आपल्या शेवटच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून बोल्ट कारकिर्दीचा शेवट गोल करणार का अशी प्रेक्षकात चर्चा रंगली होती.

या १००*४ रिलेची सुरुवात करण्यासाठी संघ मैदानावर आले. जमैका कडून धावणाऱ्या बोल्टला अडथळा होता तो घरेलू संघ इंग्लंडचा आणि कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेचा. या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अवघ्या विश्वाचे डोळे या स्पर्धेकडे लागले. शेवटचे १०० मीटर धावण्यासाठी बोल्ट उभा होता. बॅटन आता जमैकाचा तिसरा खेळाडू असणाऱ्या योहान ब्लेक यांच्याकडे आली. त्याने वेगवान धावण्यास सुरुवात केली. १५ वर्षे आपल्या उत्तम कामगिरीने देशाचे नाव उंचावणाऱ्या बोल्टची कारकिर्दीतील शेवटची शर्यंत त्याला जिंकून देण्यात मदत करावी असाच त्याचा हेतू होता.

योहान ब्लेकने बाकी प्रतिस्पर्धी खेळाडूना टक्कर देत योग्य वेळी बॅटन बोल्ट याला दिली. इंग्लंड आणि अमेरिकेच्या धावपटूंकडे देखील बॅटन पोहचली होती. शेवटचे १०० मीटर अंतर कापायचे होते आणि आपली शेवटची शर्यत जिंकण्याच्या निर्धाराने बोल्टने वेग वाढवण्याचा प्रयन्त केला. पण हे नियतीला मान्य नसावे. त्याने धावण्याचा वेग वाढवला आणि ऐन शर्यतीत त्याच्या स्नायूंच्या दुखापतीने डोके वर काढले. वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यामुळे बोल्ट धावण्याच्या ट्रकवरच पडला. त्याला स्नायूंच्या वेदनेपेक्षा आपल्या सुवर्णमयी कारकिर्दीचा शेवट असा होईल, आपण शेवटची शर्यत पूर्ण देखील करू शकलो नाही. याच्या जास्त वेदना होत असणार हे नक्की. इंग्लंडच्या संघाने या शर्यतीत सुवर्ण मिळवले तर अमेरिकेच्या संघाने रौप्य पदक मिळवले.

१५ वर्षे जागतीक स्पर्धेत आपले वर्चस्व स्थापन करून साऱ्या विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा बोल्ट कारकिर्दीतील अंतिम शर्यत जिंकू शकला नाही. आजपर्यंतचा सर्वात महान धावपटु उसेन बोल्ट व्यावसायीक स्पर्धेत आपणास धावताना दिसणार नाही. त्याला आणि त्याच्या कार्याला सलाम करू आणि त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!