पीवायसी करंडक 14वर्षाखालील गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद  

पुणे:  पीवायसी हिंदु जिमखाना क्लब आयोजित जावडेकर आणि स्कायआय पीवायसी करंडक 14वर्षाखालील गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत  व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी संघाने केडन्स क्रिकेट अकादमीचा 19 धावांनी संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीवायसी क्लबच्या मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 42षटकात 8बाद 201धावा केल्या. त्यात महत्वाचा वाटा ओंकार राजपूतने केलेल्या अर्धशतकी खेळीचा होता. ओंकारने 67 चेंडूत 55 धावा, तर कबीर भट्टाचार्जीने 57 चेंडूत 42 धावा केल्या. ओंकार राजपूत(55धावा)  व कबीर भट्टाचार्जी(42 धावा)यांनी पाचव्या विकेटकरीता 100चेंडूत 87धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तर देताना ओंकार राजपूत व ओम भाबड यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे  केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 39.5षटकात 182धावांवर संपुष्टात आला. यात अर्शीन कुलकर्णी 37, वेदांत जगदाळे 26, दिग्विजय पाटील 31, मोहित दहीभाते 29, अनिरुद्ध साबळे 25, प्रथमेश थिटे 15 यांनी दिलेली लढती अपुरी ठरली. व्हेरॉककडून ओंकार राजपूत व ओम भाबड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा ओंकार राजपूत अंतिम सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेतील विजेत्या  व्हेरॉक  वेंगसरकर क्रिकेट अकादमी  संघाला करंडक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्कायआय डेव्हलपर्सचे अभिजीत जगताप आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसीच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, रणजीत पांडे, इंद्रजित कामतेकर, पराग शहाणे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 42षटकात 8बाद 201धावा(ओंकार राजपूत 55(67,5×4), कबीर भट्टाचार्जी 42(57), वैभब आगम 36(40), भार्गव महाजन नाबाद 21(17), अनिरुद्ध साबळे 3-30, निशांत राजपाठक 1-20, निलय सिंघवी 1-32)वि.वि. केडन्स क्रिकेट अकादमी: 39.5षटकात सर्वबाद 182धावा(अर्शीन कुलकर्णी 37(50), वेदांत जगदाळे 26(70), दिग्विजय पाटील 31(24), मोहित दहीभाते 29(45), अनिरुद्ध साबळे 25(19), प्रथमेश थिटे 15(11), ओंकार राजपूत 2-26, ओम भाबड 2-42);सामनावीर-ओंकार राजपूत; व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 19 धावांनी सामना जिंकला.

 

इतर पारितोषिके:

सर्वोत्कृष्ट फलंदाज: क्रिश शहापुरकर(269धावा, क्लब ऑफ महाराष्ट्र);

सर्वोत्कृष्ट गोलंदाज: ओंकार राजपूत(10विकेट, व्हेरॉक);

सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: साईराज चोरगे(पीवायसी);

सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: आर्यन गोजे( केडन्स);

मालिकावीर: अर्शीन कुलकर्णी(250धावा व 3विकेट).