Video: या यष्टिरक्षकाने गमावली यष्टिचित करण्याची सोपी संधी; तीही चक्क तीन वेळा

क्रिकेट जगतात आपण नेहमीच यष्टिरक्षकांनी घेतलेले अनेक अद्भुत झेल किंवा यष्टिचित पाहत असतो. भारताचा यष्टीरक्षक एम एस धोनीचे तर विजेच्या वेगाप्रमाणे होणारे यष्टिचित प्रसिद्धच आहेत. पण एखाद्या यष्टिरक्षकाने यष्टिचित करण्याची किंवा झेल घेण्याची सोडलेली संधी क्वचितच पाहायला मिळते आणि असे झाले ते हाँगकाँग ट्वेंटी -20 ब्लिझ स्पर्धेत.

हाँगकाँग आयलँड युनायटेड संघाचा यष्टीरक्षक झीशान अलीने यष्टिचित करण्याची मिळालेली सोपी संधी गमावली. याचा व्हिडीओ हॉंगकॉंग ट्वेंटी -20 ब्लिझच्या ट्विटर अकाउंटवरून शेयर करण्यात आला आहे.

परवा हाँगकाँग आयलँड युनायटेड विरुद्ध सिटी कैटक यांच्यातील सामन्यादरम्यान हा किस्सा घडला. सिटी कैटकचा अंशुमन रथ हा २० धावांवर असताना त्याला यष्टिचित करण्याची संधी अलीला मिळाली होती. पण तीन वेळा चेंडू उडून हातात आल्यानंतर त्याने यष्टिचित केले खरे पण तो पर्यंत चेंडू हातातून निसटून गेला होता. या दवडलेल्या संधीमुळे मात्र गोलंदाज यष्टिरक्षकावर वैतागलेला दिसला.

या मिळालेल्या जीवदानानंतर रथने २२ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. तसेच त्याचा संघसहकारी काईल कोएत्झरने शतक केले. या दोंघांच्या खेळीमुळे सिटी कैटक संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँग आयलँड युनायटेड संघाला अवघड गेले. ते २० षटकात ९ बाद १६९ धावाच करू शकल्याने या सामन्यात सिटी कैटक संघाने २६ धावांनी विजय मिळवला.