विम्बल्डन: विजेतेपदासाठी व्हिनस मुगुरुझा आमने-सामने

महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी स्पेनची गॅब्रील मुगुरुझा आणि अमेरिकेची व्हीनस विलियम्स आमने सामने आले आहेत. हा अंतिम सामना शनिवारी विम्बल्डनच्या सेन्टर कोर्टवर होईल.

१०व्या मानांकित व्हीनस विलियम्सने ६व्या मानांकित जोहाना कोंताला उपांत्यफेरीत ६-४, ६-२ असे पराभूत केले. याबरोबर व्हीनसने विम्बल्डनमधील ८७ वा विजय मिळवला. २००९ नंतर प्रथमच व्हीनस विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. ही व्हीनसची ९वी विम्बल्डन फायनल असून ह्या वर्षीची दुसरी ग्रँडस्लॅम फायनल आहे. आजपर्यंत सेरेना विलियम्स आणि मार्टिना हिंगीस सोडून कोणत्याही खेळाडूने व्हीनसला अंतिम फेरीत पराभूत केलेले नाही.

२०१६ ची फ्रेंच ओपन विजेती गॅब्रील मुगुरुझा ही दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. यापूर्वी तिने २०१५ साली अंतिम फेरीत व्हीनसची छोटी बहीण असणाऱ्या सेरेनाकडून पराभूत झाली होती. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी मुगुरुझाने स्लोवाकियाच्या बिगरमानांकीत माग्दालेना रिबारीकोवाला ६-१, ६-१ असे पराभूत केले. विशेष म्हणजे आजपर्यंत मुगुरुझाने ज्या ज्या अंतिम फेरीत ग्रँडस्लॅमच्या प्रवेश केला आहे त्यात तिला विलियम्स भगिणींपैकी एकीचा सामना करावा लागला आहे.